बीएमसीने कंगनाला पाठवलेली नोटीस बेकायदेशीर; कंगना रनौतच्या वकिलांचा आरोप
कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या वादविवादांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने ही कारवाई केली असल्याचा आरोप कंगनाचे वकिल रिझवान यांनी केला आहे.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतमध्ये सुरु असलेलं वाकयुद्ध काही संपायचं नाव घेत नाही. अशातच आज कंगना मुंबईत येणार आहे. परंतु, त्याआधी मंगळवारी कंगनाच्या मुंबईतील ऑफिसला मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली. मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचं कंगनाच्या वकिलांनी सांगितलं असून त्यांनी यासंदर्भात अनेक प्रश्नही उपस्थित केले.
एबीपी न्यूजशी बोलताना कंगनाचे वकिल रिजवान म्हणाले की, 'माझे अशिल कंगना यांच्या अनुपस्थितीत बंगल्यात महानगरपालिकेचे कर्मचारी जबरदस्तीने घुसले. जे बेकायदेशीर असून त्यासाठी कंगनाच्या वतीने बीएमसीच्या विरोधात ट्रेसपासिंग आणि जबाबी कारवाईची नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना जेलची शिक्षा होऊ शकते.
कंगनाला चुकीची आणि अवैध्य नोटीस
कंगनाच्या वकिलांनी सांगितलं आहे की, बीएमसी द्वारे 'स्टॉप वर्क' अंतर्गत जी नोटीस कंगनाच्या ऑफिसच्या गेटवर लावण्यात आली आहे. ती चुकीची आहे. अवैध्य आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं अवैध्य काम सुरु नव्हतं. मग 'स्टॉप वर्क' नोटीस कशाच्या आधारावर देण्यात आलं? कंगनाच्या वकिलांनी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले की, बीएमसीने बंगल्यात बदल केल्याची बाब नोटीसमध्ये दिली आहे. अशातच कायदेशीररित्या कंगनाला 7 दिवसांत जबाब देण्याची नोटीस जारी केली पाहिजे होती. पण बीएमसीने फक्त एक दिवसांत जबाब देण्याची नोटीस जारी केली आहे. हे मुद्दाम कंगनाला त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचंही कंगनाचे वकिल म्हणाले.
My Lawyer @RizwanSiddiquee has replied to @mybmc notice hope they hold on to their plans of demolishing the property... pic.twitter.com/tToaBQ0tG0
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 8, 2020
बदला घेण्यासाठी कारवाई
बीएमसीद्वारे करण्यात आलेली कारवाई कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या वादविवादांच्या पार्श्वभूमीवर आहे, असंही रियाचे वकिल म्हणाले आहेत.
काय आहे कंगना रानवतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम
1. ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिनमध्ये रूपांतरीत केले आहे.
2. स्टोअर रूमचा किचन रूममध्ये रूपांतर
3. ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट
4. तळ मजल्यावर अनधिकृत किचन तयार
5. देवघर आणि लिव्हिंग रूममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन
6. पहिल्या मजल्यावर अनधिकृत टॉयलेट
7. समोरील बाजूस अनधिकृत स्लॅबची निर्मिती
8. दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना तयार केला आहे.
9. दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी बांधण्यात आली आहे.
नोटीससोबत घराचा फोटो
मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या ऑफिसच्या गेटवर ही नोटीस लावली असून त्या नोटीसमध्ये घराचा एक फोटोही आहे. तसेच नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे की, घरातील कोणता भाग पालिकेकडे दाखल केलेल्या कागपत्रांनुसार नाही. दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु असतानाच, मुंबई पालिकेने केलेल्या कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- कंगना रनौतच्या ऑफिसला महापालिकेकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा कंगनावर ठपका
- ना डरूंगी, ना झुकूँगी.... मुंबईत येण्यापूर्वी कंगना रनौतचं ट्वीट
- 'मुंबाई मातेचा अवमान करणारे बेइमान', सामनातून टीका, कंगनानंही दिलं उत्तर
- 'विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी', अमृता फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला
- कंगनाविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा कंगाना काय अधिकार? निवृत्त पोलिसाची कोर्टात याचिका