Adhantar : जयंत पवारांचं 'अधांतर' पुन्हा रंगभूमीवर येणार; 25 वर्षांपूर्वी गाजलेलं नाटक
Adhantar : 'अधांतर' हे 25 वर्षांपूर्वी गाजलेलं नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार आहे.
Adhantar : मराठी नाट्यरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवंगत लेखक जयंत पवार लिखित 'अधांतर' (Adhantar) हे नाटक तब्बल 25 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर सादर होणार आहे. 'प्रयोगशाळा' संस्थेने या नाटकाची निर्मिती केली असून 'नाटक मंडळी' ते सादर करत आहेत. आता पुन्हा एकदा हे नाटक नव्याने रंगभूमीवर येणार आहे.
'अधांतर' या नाटकात गिरणी संपानं पिचलेल्या मराठी कुटुंबाची व्यथा मांडण्यात आली आहे. जयंत पवार यांची संहिता, मंगेश कदम यांचं दिग्दर्शन असलेल्या 'अधांतर' या नाटकाचा मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकांमध्ये समावेश होतो. 25 वर्षांपूर्वी आलेल्या या नाटकाने 'कामगार' हा विषय सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला.
'अधांतर'चे होणार 25 प्रयोग
'अधांतर' हे वास्तववादी नाटक असून गिरणी कामगारांच्या संपावर कौटुंबिक दृष्टिकोनातून भाष्य करणारं हे नाटक आहे. आजही हे नाटक तितकचं परिणामकारक आहे. 25 वर्षांनंतर हे नाटक रंगभूमीवर येत असून या नाटकाचे आता फक्त 25 प्रयोग होणार आहेत. नव्या दमाच्या कलाकारांसोबत या नाटकाचे प्रयोग रंगणार आहेत.
प्रचंड गाजलेलं नाटक
सूत गिरण्या, कामगार, चाळी, तिथले ताणतणाव, कामगारांचं विस्थापन, दलित पँथर, आंबेडकरी चळवळीचं योगदान आअनियतकालिकांची चळवळ, पुरोगामी साहित्य, डाव्यांचे लढे आणि हताशपण, काळानुसार कोसळणारे बदल, जागतिकीकरणाचा प्रभाव, गुंडगिरी, जातपातधर्माचं वाढतं प्राबल्य आणि शहरी भकासपण अशा अनेक गोष्टी या नाटकाच्या क्रेंद्रस्थानी होत्या. त्यामुळे 'अधांतर' हे नाटक प्रचंड गाजलं.
'अधांतर' नाटकासंदर्भात बोलताना एका मुलाखतीत संजय नार्वेकर म्हणाला,"माझ्या कारकिर्दीत अधांतरचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. माझ्या संघर्षाच्या काळात हे नाटक मला मिळालं. मंगेश कदम यांच्यासारखा मुरलेला दिग्दर्शक आणि स्वत: जयंत पवार आमच्या मदतीला होते. नरुची भूमिका खूप आव्हानात्मक होती. पण अशा कलाकृतीमुळे खूप शिकता येतं".
'अधांतर' या नाटकात संजय नार्वेकर नरुच्या मुख्य भूमिकेत होता. संजय नार्वेकरसह ज्योती सुभाष, राजन भिसे, अनिल गवस, लीना भागवत, आशिष पवार आणि भरत जाधव हे कलाकार 'अधांतर'च्या जुन्या संचात महत्त्वाच्या भूमिकेत होते. आता नव्या संचात हे नाटक पाहण्याची नाट्यरसिकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या