गौहर खानचा 11 वर्षे लहान झैद दरबारसोबत साखरपुडा, वडील इस्माईल दरबार म्हणतात...
अभिनेत्री गौहर खानने डान्सर झैद दरबार याच्यासोबत साखरपुडा केला. झैद हा गौहरपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. या दोघांनी साखरपुडा केल्याचं त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे समजल्याचं झैदचे वडील इस्माईल दरबार यांनी सांगितलं.
मुंबई : अभिनेत्री गौहर खानने डान्सर झैद दरबार याच्यासोबत नुकताच साखरपुडा केला. दोघांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या साखरपुड्याची बातमी सांगितली. सोबतच गौहर आणि झैद येत्या 25 डिसेंबरला निकाह करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र गौहर आणि झैद यांच्याकडून निकाहच्या तारखेची अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. झैद दरबार हा संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे.
झैद दरबार हा गौहर खानपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. गौहर याआधी अभिनेता कुशाल टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. बिग बॉस ७ मध्ये त्यांच्या नात्याला सुरुवात झाली होती. परंतु त्यांचं नातं लवकरच संपुष्टात आलं. मोठ्या वादानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. परंतु जुन्या गोष्टी विसरुन ते आता आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.
View this post on Instagram
झैदने गौहरसोबत साखरपुडा केल्याचं त्या दोघांच्या पोस्ट पाहूनच समजल्याचं इस्माईल दरबार यांनी सांगितलं. ते म्हणाले की, ज्याप्रकारे लोक गौहर आणि झैदची पोस्ट पाहत आहेत, त्याचप्रकारे मलाही त्यांची पोस्ट पाहूनच दोघांनी साखरपुडा केल्याचं समजलं. खरं सांगायचं झालं तर आमच्या कुटुंबात आजही एक रीत पाळली जाते. ही रीत अशी की मुलगा आपल्या वडिलांकडे स्वत:च्या लग्नाची चर्चा करत नाही. झैदने आतापर्यंत एकदाही माझ्याकडे त्याच्या लग्नाचा उल्लेख केलेला नाही.
इस्माईल पुढे म्हणाले की, "मला सांगण्याची त्याची हिंमत नाही. तो त्याची आई आएशाच्या अतिशय जवळ आहे. आएशाला त्याने गौहरबाबत सांगितलं आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. यानंतर आएशाने मला याबाबत सांगितलं आणि मी होकार दिला. माझ्या मुलाला देशातली कोणतीही मुलगी आवडत असेल आणि त्यांना एकमेकांसोबत राहायचं असेल तर मी त्याच्या निर्णयासोबत कायम उभा राहिन. त्याच्या आनंदात माझा आनंद आहे. तो आणि गौहर त्यांच्या नात्याबाबत गंभीर आहेत आणि मला त्यात कोणतीही अडचण नाही. माझा मुलगा आनंदी राहो एवढीच माझी इच्छा आहे.
यासोबत लग्नाच्या तारखेबाबत इस्माईल दरबार यांनी पुढे सांगितलं की, "माझ्यावर विश्वास ठेवा, मला सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे समजलं की, हे दोघे डिसेंबरमध्ये लग्न करत आहे. इतकंच नाही तर त्याने आपल्या आईलाही हेच सांगितलं की लग्न करणारच्या वेळी मला येऊन सांगेल. ज्या दिवशी झैद मला लग्नाबाबत सांगेल तेव्हा आम्ही तयारी सुरु करु. मला माझ्या मुलाला सेटल झाल्याचं पाहायचं आहे. लवकरच यांचं लग्न लावून देऊ. परंतु तारीख अद्याप ठरलेली नाही. मात्र या वर्षअखेरीस आनंदाची गोष्ट नक्कीच घडेल.