International Emmy Awards 2023 : आंतरराष्ट्रीय पातळीवर विनोदवीर वीर दासने रोवला भारताचा झेंडा; एमी पुरस्कारावर कोरलं नाव
Vir Das : अभिनेता आणि विनोदवीर वीर दासला 'एमी पुरस्कार 2023' जाहीर झाला आहे.
International Emmy Awards 2023 : 'एमी पुरस्कार 2023' (International Emmy Awards 2023) या आंतराराराष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका वाजला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विनोदवीर वीर दासने (Vir Das) भारताचा झेंडा रोवला आहे. एमी पुरस्कारावर विनोदवीराने नाव कोरलं आहे.
वीर दासला त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळाला आहे. नेटफ्लिक्सच्या (Netflix) 'वीर दास लँडिंग' (Vir Das : Landing) या कार्यक्रमासाठी त्याला एमी पुरस्कार मिळाला आहे. न्यूयॉर्कमध्ये 51 वा एमी आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला.
We have a Tie! The International Emmy for Comedy goes to "Vir Das: Landing” produced by Weirdass Comedy / Rotten Science / Netflix#iemmyWIN pic.twitter.com/XxJnWObM1y
— International Emmy Awards (@iemmys) November 21, 2023
वीर दासला 2021 मध्येदेखील त्याच्या 'टू इंडिया' या विनोदी कार्यक्रमासाठी एमी आंतरराष्ट्रीय पुरस्काराचं नामांकन मिळालं होतं. पण त्यावेळी तो हा पुरस्कार जिंकू शकला नाही. यावेळी शेफाली शाह (Shefali Shah), वीर दास (Vir Das) आणि जिम सर्भ (Jin Sarbh) या भारतीयांना नामांकन मिळालं होतं. शेफालीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या शर्यतीत नामांकन जाहीर झालं होतं. जिम सर्भला 'रॉकेट बॉइज 2' या सीरिजमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या कॅटेगरीमध्ये नामांकन जाहीर झालं आहे.
एमी पुरस्कार जिंकणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट : वीर दास
एमी पुरस्कार मिळाल्यानंतर विनोदवीर वीर दास म्हणतो,"हा क्षण खरचं खूप कमाल आहे. सगळचं स्वप्नवत आहे. 'कॉमेडी कॅटेगरी'मध्ये 'वीर दास: लँडिंग'साठी एमी पुरस्कार जिंकणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 'वीर दास: लँडिंग'चं जागतिक स्तरावर कौतुक होत आहे".
'एमी पुरस्कार 2023' हा पुरस्कार सोहळा न्यूयॉर्कमध्ये पार पडला आहे. एकता कपूर यांनाही (Ekta Kapoor) या पुरस्कार सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वीर दाससोबत या शर्यतीत फ्रान्सचा फ्लैम्ब्यू, अर्जेंटीनाचा एल एनकारगाडो आणि यूकेच्या 'डेरी गर्ल्स सीझन 3'चा समावेश होता. आता वीर दासला पुरस्कार मिळाल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. नेटफ्लिक्सवरील वीर दासचा 'वीर दास : लँडिग' हा कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण शेफाली शाहचा पुरस्कार हुकल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत.
संबंधित बातम्या