मराठीचा माज बेळगावमध्ये जाऊन करायचा नाही मग कुठे? Boyz 3 च्या वादावर अवधूत गुप्ते व्यक्त झाला, म्हणाला...
Boyz 3 : 'बॉइज 3' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या हा सिनेमा चर्चेत आहे.
![मराठीचा माज बेळगावमध्ये जाऊन करायचा नाही मग कुठे? Boyz 3 च्या वादावर अवधूत गुप्ते व्यक्त झाला, म्हणाला... If you dont want to do Marathi in Belgaon then where Avadhoot Gupte expresses on Boyz 3 controversy says मराठीचा माज बेळगावमध्ये जाऊन करायचा नाही मग कुठे? Boyz 3 च्या वादावर अवधूत गुप्ते व्यक्त झाला, म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/16/02923351d876cc4acc5dd5a6e31bff321663342784961254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Boyz 3 : आगामी मराठी 'बॉइज 3' (Boyz 3) या सिनेमाला कर्नाटक, बेळगावातील काही संस्थांनी विरोध केला आहे. कर्नाटक आणि बेळगावात हा सिनेमा दाखवू नये, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाबाबत चित्रपटाचे निर्माता अवधूत गुप्तेने (Avadhoot Gupte) एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,"सर्वप्रथम प्रेक्षकांनी 'बॉइज 3' हा सिनेमा पाहावा. माझी खात्री आहे की, 'बॉइज 3' हा सिनेमा पाहिल्यानंतर महाराष्ट्रातून कर्नाटकला फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढेल. त्यामुळे कर्नाटकाच्या महसूलामध्ये दहापट वाढ होईल.
'बॉइज 3' हा सिनेमा प्रेक्षकांना आवडणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सिने-रसिक हा सिनेमा पाहिल्यानंतर कर्नाटक, बेळगावातील सिनेमात दाखवण्यात आलेल्या जागा म्हणजेच पर्यटनस्थळ आवर्जुन बघतील, असा विश्वास अवधूत गुप्तेने व्यक्त केलाय. 'बॉइज 3' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
"मराठीचा माज बेळगावमध्ये जाऊन करायचा नाही मग कुठे? सिनेमातील हे वाक्य सेन्सॉर करून घेतलेलं आहे. सेन्सॉरने या वाक्याला संमंती दिलेली आहे. याचाच अर्थ काहीतरी तथ्य आहे. बेळगाव महाराष्ट्राचं की कर्नाटकांचं हा वाद गेल्या कित्येक पिढ्या सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला बेळगावबद्दल जी आत्मीयता वाटते. जे प्रेम वाटतं आणि बेळगाववर जो अधिकार वाटतो, यावर दुमत असू शकत नाही, असे अवधूत गुप्ते म्हणाला."
केजीएफसारखे सिनेमे महाराष्ट्राने का उचलून धरले?
'बॉइज 3' वादासंदर्भात बोलताना अवधूत गुप्ते म्हणाला, प्रत्येक मराठी माणूस कानडी माणसाचा किंवा कर्नाटकाचा दुस्वास करतो. त्यांच्याशी वाकडं आहे अशातला भाग नाही. जर तसं असतं तर केजीएफसारखे सिनेमे महाराष्ट्राने का उचलून धरले असते. वाद आहे तो कोर्टात आहे. त्याबद्दल जे व्हायचं ते होईल. तोपर्यंत आम्ही बेळगाववरचं प्रेम अजीबात लपवणार नाही.
विरोधकांना विचारायचं आहे की, 'बॉइज 3' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होऊन एक महिना झाला आहे. जर तुम्हाला सिनेमातलं वाक्य खटकत होतं तर ते सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशीचं का बोललात. तक्रार करायची होती तर गेल्या महिन्याभरात का केली नाही? असा सवाल अवधूत गुप्ते यांनी उपस्थित केला. हे कन्नड भाषियांचं मत असू शकतं, ज्याचा आम्हाला आदर आहे. पण कन्नड भाषियांना सिनेमा पाहण्याचं आवाहन करतो, असेही गुप्ते म्हणाला.
'बॉइज 3' नेमकं प्रकरण काय?
'बॉइज 3' या सिनेमातील एका दृश्यात पोलीस स्थानकात आलेल्या तरुणाला पोलीस स्थानकातील अधिकारी म्हणतो, ‘नो मराठी, ओन्ली इंग्लिश, इलदिद्र कन्नड’. त्यावर तो तरुण पोलीस अधिकाऱ्याला सांगतो, ‘साहेब जर तुम्हाला तुमच्या भाषेचा माज करता येतो, तर आम्हाला आमच्या भाषेची लाज राखता येते. मराठी भाषेचा माज बेळगावात दाखवायचा नाही, तर कुठे दाखवायचा?’, असा सवाल तो तरुण पोलीस अधिकाऱ्याला करतो. सिनेमातील या संवादाला कर्नाटक रक्षण वेदिकेने आक्षेप घेतला असून, यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'बॉइज 3' सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
संबंधित बातम्या
Boyz 3 : चित्रपटातील संवादांवर आक्षेप, बेळगावात ‘बॉईज 3’च्या प्रदर्शनाला विरोध!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)