घरात कोविड-19 रुग्ण असल्यास तर कपडे धुताना कोणती काळजी घ्यावी? करीना कपूरच्या खास टिप्स
घरात कोविड-19 संशयित किंवा रुग्ण असेल तर कपडे सुरक्षितरित्या कसे धुवावेत आणि वाळवावेत, जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही, याबाबत अभिनेत्री करीना कपूरने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही टिप्स शेअर केल्या आहेत.
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान वादापासून शक्यतो दूर राहते आणि वादग्रस्त वक्तव्ये करणंही टाळते. पण जिथे गरज आहे तिथे ती नक्कीच आपलं मत मांडते. कोरोना महामारी दरम्यान करीनाची हेच वैशिष्ट्य समोर आलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून करीना सातत्याने कोरोना महामारीबाबत जागरुक करण्याचं काम करत आहे. मग लहान बाळांचा विषय असो वा मातांचा, करीना सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती शेअर करते.
आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीमधून महत्त्वाची माहिती शेअर केली आहे, यामध्ये जर घरात कोविड-19 संशयित किंवा रुग्ण असेल तर कपडे सुरक्षितरित्या कसे धुवावेत आणि वाळवावेत, जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही.
जाणून घेऊया करीनाने दिलेल्या काही टिप्स
- कोरोनाबाधित रुग्णांचा टॉवेल, चादर स्वतंत्र धुवावी.
- हे हाताळताना जाड हॅण्डग्लोव्ज घालावेत
- त्यांचा शरीराला स्पर्श टाळावा, लीक न होणाऱ्या एका वेगळ्या भांड्यात ते ठेवावेत
- 60 ते 90 अंश तापमानात डिटर्जंटने हे कपडे धुवावेत किंवा कपडे गरम पाण्यात भिजवून ठेवावेत, यावेळी एखाद्या काठीचा वापर करावा. हे करताना पाणी उडू नये याची काळजी घ्या
- गरम पाणी नसेल तर क्लोरिन टाकून अर्धा तास कपडे भिजत ठेवा. स्वच्छ पाण्यात कपडे घुसळून उन्हात वाळवा
- सर्व काम झाल्यानंतर आपले हात धुवायचे विसरु नका
याआधी कोविड-19 चा संसर्ग होऊ शकणाऱ्या गर्भवती तसंच स्तनदा मातांना संदेश देणारी पोस्ट करीनाने शेअर केली होती. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं. त्यांनी घरात बनवलेलं पौष्टिक अन्न खावं, शिवाय अशा महिलांच्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक ठेवावं, असं करीनाने आपल्य संदेशात म्हटलं होतं.
दरम्यान, करीनाने काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. परंतु यावेळी तिने या बाळाला कॅमेऱ्यापासून दूरच ठेवलं आहे. करीना आता आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात झळकणार आहे.