Hardeek Joshi : हार्दिक जोशीसाठी यंदाचा गणेशोत्सव असणार स्पेशल; म्हणाला,"अक्षयाच्या पद्धतीने..."
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' या सेगमेंटमध्ये अभिनेता हार्दिक जोशीने (Hardeek Joshi) सांगितलं की, यंदाचा गणेशोत्सव खूप खास असणार आहे.
Hardeek Joshi On Kalavantancha Ganesh : 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेला राणादा अर्थात हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि बाप्पाचं नातं खूप खास आहे. तसेच यंदाचा गणेशोत्सव लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव असल्यामुळे तोही खास असणार आहे.
एबीपी माझाशी बोलताना हार्दिक जोशी म्हणाला,"गणपती बाप्पा आणि माझं खूप वेगळं नातं आहे. बाप्पा आल्यावर एक पाहुणा आपल्या घरी आला आहे, असं वाटतं. तो आपल्या कुटुंबाचाच एक भाग असतो. आपण त्याची सेवा करतो त्यानंतर तो आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो. बाप्पा आल्यावर ते पाच दिवस आपण लहान होतो. बाप्पाच्या पायाशी झोपायला मला आवडतं. बाप्पा आल्यावर आपल्याला बालपण देतो असं मला वाटतं. आमच्याकडे पाच दिवसांचा बाप्पा असतो. गेल्या 38-39 वर्षांपासून आमच्याकडे बाप्पा येत आहे".
View this post on Instagram
बालपणीतला गणेशोत्सव कायम आठवणीत राहील : हार्दिक जोशी
बाप्पाबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला,"बाप्पा माझ्या पाठीशी आहे, असं मला नेहमीच वाटतं. बाप्पा आल्यावर एक सकारात्मक उर्जा आसपास येते. कोणत्याही कामाची सुरुवात 'गणपती बाप्पा मोरया' असं म्हणून करतो. गणेशोत्सवाने मला कलाकार म्हणून घडवलं. सोसायटीत पाच दिवसांचा सार्वजनिक गणपती असायचा. त्यावेळी चित्रकला, गाढवाला शेपूट लावणे, क्रिकेट अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. या सर्व स्पर्धांनी मला घडवलं असून आज मी हे खूप मीस करतो. बालपणीतला गणेशोत्सव कायम आठवणीत राहील.
हार्दिक पुढे म्हणाला,"मोठा भाऊ नाशकात असतो. त्याच्याकडे गणपती असतो. यंदाचा गणेशोत्सव लग्नानंतरचा पहिला आहे. त्यामुळे अक्षयाला बाप्पाची सजावट जशी करायची असेल तशी होणार. एकंदरीतच यंदाचा गणेशोत्सव अक्षयाच्या (Akshaya Deodhar) पद्धतीने साजरा होणार आहे. आरास सुटसुटीत करण्यावर माझा भर असतो. बाप्पाला बंदीस्त ठेवायला मला आवडत नाही. मला मोदक खायला प्रचंड आवडत असून गणेशोत्सवात मी डाएट करत नाही". 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत प्रेक्षकांनी राणादाला मोदकावर ताव मारताना पाहिलं आहे. पण खऱ्या आयुष्यातही हार्दिकला मोदक खायला प्रचंड आवडतं.