Gautami Patil : 'त्या' विकृत घटनेनंतर व्हॅनिटी व्हॅन वापरण्याची आली वेळ : गौतमी पाटील
Gautami Patil : 'त्या' विकृत घटनेनंतर गौतमी पाटीलला व्हॅनिटी व्हॅन वापरण्याची वेळ आली आहे.
Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटील' अशी अल्पावधीत ओळख मिळवलेली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमी पाटीलला (Gautami Patil) याचे फायदे आणि तोटेही सहन करावे लागत आहेत. दररोज वेग-वेगळ्या कारणाने गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकते. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या घृणास्पद घटनेने गौतमीला धक्काच बसला. आता या विकृत घटनेनंतर तिच्यावर व्हॅनिटी व्हॅन वापरण्याची वेळ आली आहे.
गौतमीच्या नृत्याचे दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. याआधी पडद्याआडदेखील कपडे बदलून ती कार्यक्रमाला उभी राहत असे. पण त्या विकृत घटनेने तिला खडबडून जागे केले आणि तिने कार्यक्रमाला आता व्हॅनिटी व्हॅन वापरायला सुरुवात केली आहे. सोबत आता बाउन्सर देखील तिच्या व्हॅन भोवती दिसू लागले आहेत. आता गौतमी कार्यक्रमासाठी होकार देण्यापूर्वी व्हॅनिटीची व्यवस्था करण्याची मागणी करू लागली आहे. तसेच ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी किमान कपडे बदलण्यासाठी चार भिंतीची बंदिस्त खोली तरी द्यावी असं गौतमी सांगते. त्या विकृत घटनेनंतर आता गौतमी सावरली असून सावधदेखील झाली आहे.
गौतमी पाटीलच्या नृत्याचा नुकताच पंढरपुरात कार्यक्रम पार पडला. यादरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली,"माझा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मी व्हॅनिटी व्हॅन वापरायला सुरुवात केली आहे". महाराष्ट्रात गावोगावी हजारोंच्या रेकॉर्डब्रेक उपस्थितीत कार्यक्रम करणाऱ्या गौतमी पाटीलला आता इतर राज्यातूनही कार्यक्रमासाठी मागणी येऊ लागली आहे. पण सध्या तरी महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला नसल्याचा गौप्यस्फोट गौतमी पाटीलने माझाशी बोलताना केला.
गौतमीच्या नखरेल अदाकारीवर अवघा महाराष्ट्र फिदा झाला आहेच पण सोशल मीडियावर तिच्या रिल्स आणि व्हिडिओला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. यातूनच आता गौतमीचे कार्यक्रम आपल्याही राज्यात व्हावेत यासाठी आयोजक धडपडू लागले आहेत. याबाबत तिला थेट विचारताच तिने अशी मागणी येत असली तरी अजून महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम करण्याबाबत विचार केला नसल्याचे तिने सांगितले आहे.
गौतमी पाटीलचा पहिला सिनेमा दोन महिन्यात येणार प्रेक्षकांच्या भेटीला
गौतमी पाटीलचा पहिला सिनेमा येत्या दोन महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'घुंगरू' असे या सिनेमाचं नाव आहे. नृत्य कलावंताच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा असल्याचे गौतमीने सांगितले. या सिनेमा बहुतांश शूटिंग सोलापूर आणि पुणे परिसरात झाले असून गौतमीला या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.
एका कार्यक्रमाचे 3 लाख मिळतात? गौतमी पाटीलने स्पष्टचं सांगितलं...
गौतमीच्या मानधनावरून इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या टिप्पण्णीवर देखील तिने खुलासा करताना महाराजांचा कोणी तरी गैरसमज करून दिल्याचे सांगितले. माझे मानधन नक्कीच तेवढे नाही, माझ्याबाबत सातत्याने असे गैरसमज पसरवले जात असल्याचे तिने सांगितले. तीन गाण्याला तीन लाख मला कोण द्यायला लागलं आहे? असे सांगत इतके पैसे द्यायचे असतील तर ते एखाद्या अभिनेत्रीला देणार नाहीत का? असा सवाल देखील गौतमी करते. माझ्याबद्दल रोज कोणीतरी अशा अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र मला कोणाबद्दल काहीच आक्षेप नसून मला कोणत्या वादावर भाष्य देखील करायचे नाही अशी समजुतीची भूमिका गौतमीने घेतली.
संबंधित बातम्या