Chinmay Mandlekar : गणेश चतुर्थीला 'वादळवाट' मिळाली, तेव्हापासून दरवर्षी रेकॉर्ड कायम, चिन्मयसाठी बाप्पा का आहे खास?
Kalavantancha Ganesh : अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या (Chinmay Mandlekar) करिअरची सुरुवात गणेशचतुर्थीच्या दिवशी झाली आहे.
Chinmay Mandlekar On Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पाच्या (Ganapati Bappa) आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि बाप्पाचं खास नातं आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाला,"माझ्या करिअरची सुरुवात गणेशचतुर्थीच्या दिवशी झाली आहे".
बाप्पाबद्दल (Ganapati Bappa) बोलताना चिन्मय मांडलेकर म्हणाला," कोणत्याही देवाचं आणि भक्ताचं जे नातं असतं तसंच आहे. गणपती हा आपलासा वाटणारा देव आहे. लहानपणी 'गणेशोत्सव' म्हटलं की खूप आसपास खूप आनंदाचं वातावरण असायचं. गल्लीतल्या कार्यक्रमांपासून ते घरी मोदक बनवण्यापर्यंत असं उत्साहमय वातावरण होतं. पुढे मोठं होत गेल्यावर गणपतीचं अध्यात्मिक महत्त्व कळत गेलं. त्यानंतर बाप्पासोबतचं नातं आणखी दृढ होत गेलं. आमच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा असतो".
बाप्पाचं आणि माझं विशेष नातं : चिन्मय मांडलेकर
चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar On Ganapati Bappa) पुढे म्हणाला,"बाप्पा माझ्या पाठीशी आहे असे अनेक प्रसंग आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संकटाचा सामना करताना बाप्पाची आठवण येते आणि तो पाठीशी असतोच. बाप्पाचं आणि माझं विशेष नातं आहे. माझ्या करिअरची सुरुवात गणेशचतुर्थीच्या दिवशी झाली आहे. 'वादळवाट' ही माझी पहिली मालिका. गणेशचतुर्थीच्या दिवशीच मला या मालिकेसाठी विचारणा झाली. त्यामुळे गणेशचतुर्थीच्या दिवशी माझ्या करिअरची सुरुवात झाली आहे. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या दिवशी कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टसाठी मला विचारणा होत आहे. एकंदरीतच बाप्पाची माझ्यावर कृपा आहे".
आठवणीतल्या गणेशोत्सवाबद्दल बोलताना चिन्मय मांडलेकर म्हणाला,"माझं बालपण गिरगावात गेलं आहे. आमच्या गणेशोत्सव मंडळाचा हिरकमहोत्सव होता तेव्हा अनेक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांसह अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी मी कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो होतो. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे हा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास ठरला".
चिन्मय मांडलेकर पुढे म्हणाला,"आमच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा असतो. माझी पत्नी नेहा ही आमच्या घरातल्या गणेशोत्सव मंडळाची अध्यक्षा आणि कार्यकर्ता आहे. आम्ही दरवर्षी फुलांची बाप्पाची आरास बनवतो". अभिनेता चिन्मय मांडलेकर बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
संबंधित बातम्या