Ek Don Teen Char : निपुण धर्माधिकारी अन् वैदेही परशुरामीची हटके लव्हस्टोरी; 'एक दोन तीन चार'चा धमाकेदार टीझर रिलीज
Ek Don Teen Char : 'एक दोन तीन चार' या आगामी मल्टीस्टार सिनेमाचा टीझर आता आऊट झाला आहे. येत्या 5 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
Ek Don Teen Char : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी 2023 हे वर्ष खूपच कमाल होतं. कोरोनानंतर प्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम मराठी मनोरंजनसृष्टीने केलं आहे. अनेक मराठी सिनेमांनी (Marathi Movies) बॉक्स ऑफिस गाजवलं. आता पुढच्या वर्षाची सुरुवातदेखील मनोरंजनात्मक होणार आहे. नुकताच 'एक दोन तीन चार' (Ek Don Teen Char) या मराठी सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हा टीझर सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
एक नवीकोरी कथा असलेला 'एक दोन तीन चार' हा सिनेमा येत्या नवीन वर्षात 5 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित 'झिम्मा 2’ (Jhimma 2) हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. या मल्टिस्टारकास्ट सिनेमासोबतच 'एक दोन तीन चार' या सिनेमाचा धमाकेदार टिजर रिलीज होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा डबल बोनस ठरणार हे नक्की.
View this post on Instagram
'एक दोन तीन चार' या सिनेमाचे वैशिष्टय म्हणजे 'मुरांबा' या बहुचर्चित सिनेमानंतर वरूण नार्वेकर (Varun Narvekar) या दिग्दर्शकाचा हा पुढील सिनेमा असणार आहे. तर या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत.
दमदार कलाकारांची फौज असलेला 'एक दोन तीन चार'
'एक दोन तीन चार' या सिनेमात दमदार कलाकारांची फौज असणार आहे. सिनेमातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) हिनं केली आहे. तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीनं (Nipun Dharmadhikari) साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तर या सिनेमाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे.
नवं वर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट
आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने 'एक दोन तीन चार' या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात आलं आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी ही नवं वर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट ठरणार आहे.
निपुण धर्माधिकारीने 'एक दोन तीन चार' या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"होती खरं लव स्टोरी..पण गडबड झाली थोडी...एक दोन तीन चार' 5 जानेवारीपासून फक्त सिनेमागृहात...भेटूया नववर्षात". निपुणने शेअर केलेल्या टीझरवर चाहत्यांनी कमेंट्स करत सिनेमासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं आहे.
संबंधित बातम्या