Deepika Padukone : जे शाहरुख, प्रभासला जमलं नाही ते दीपिकाने करुन दाखवलं, रचला अनोखा विक्रम!
Deepika Padukone : दीपिकाच्या अभिनयासोबत सौंदर्याचेही कौतुक होते. दीपिकाने अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आता, दीपिकाच्या नावावर एका वेगळ्या विक्रमाची नोंद झाली.
Deepika Padukone : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. सिनेसृष्टीतील आपल्या 17 वर्षाच्या कारकिर्दीत दीपिकाने आपली वेगळी छाप सोडली आहे. दीपिकाच्या अभिनयासोबत सौंदर्याचेही कौतुक होते. दीपिकाने अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आता, दीपिकाच्या नावावर एका वेगळ्या विक्रमाची नोंद झाली.
दीपिकाची भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन अशा दिग्गज अभिनेत्यांची भूमिका आहे. कल्कीमध्ये दीपिकाने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. याच दरम्यान दीपिकाने एक वेगळा विक्रम रचला आहे. अशी कामगिरी करणारी दीपिका ही पहिली अभिनेत्री झाली आहे. दीपिकाने शाहरुख खान आणि प्रभासलाही मागे सारले आहे.
दीपिकाच्या नावावर अनोखा विक्रम...
दीपिकाने आपल्या सुमारे 17 वर्षांच्या जबरदस्त आणि यशस्वी कारकिर्दीत अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. एक हजार कोटींची कमाई करणारे तीन चित्रपट देणारी ती भारतातील पहिली अभिनेत्री ठरली आहे. शाहरुख खान आणि प्रभाससारखे सुपरस्टारही या बाबतीत त्यांच्या मागे आहेत.
View this post on Instagram
दीपिकाने एक हजार कोटींची कमाई करणाऱ्या तीन पैकी दोन चित्रपट हे शाहरुख खानसोबत केले आहेत. या दोघांनी जानेवारी 2023 मध्ये पठाणच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवलं होते. या चित्रपटाने वर्ल्डवाईड 1060 कोटींची कमाई केली. त्यानंतर या दोघांनी जवान चित्रपटातही काम केले. या चित्रपटाने वर्ल्डवाईड 1143.59 कोटींची कमाई केली. एक हजार कोटींची कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला.
'कल्की'चा बॉक्स ऑफिसवर कल्ला
'कल्की 2898 एडी'ने वर्ल्डवाईड 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे आता दीपिका ही एक हजार कोटींची कमाई करणारे तीन चित्रपट देणारी पहिली भारतीय अभिनेत्री झाली आहे. अशी कामगिरी आतापर्यंत कोणत्याही भारतीय अभिनेत्रीला करता आली नाही. दीपिकाने शाहरुखच्या दोन 1000 कोटी चित्रपटांचा विक्रम मोडीत काढला आहे. या यादीत दीपिकाचा कल्की सहकलाकार प्रभासही मागे आहे. प्रभासचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'बाहुबली 2' ने 1000 कोटींची कमाई केली होती. तर आता त्याच्या 'कल्की'नेही हा पराक्रम केला आहे.