Deepika-Ranveer in Alibag | दीपिक-रणवीरही बनले अलिबागकर! सतिर्जेत 22 कोटींना 90 गुंठे जमिनीची खरेदी
अलिबागमध्ये प्रॉपर्टी असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा देखील समावेश झाला आहे.
रायगड : बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारणी अशा अनेकांचं अलिबाग हे आवडतं ठिकाण आहे. अलिबाग मुंबईहून समुद्रमार्गे अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे. त्यामुळे अनेकांनी येथे जागा घेऊन अलिशान बंगले येथे उभारले आहेत. या यादीत आहे बॉलिवूडमध्ये मोस्ट पॉप्युलर कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचाही समावेश झाला आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण या दोघांनी अलिबाग येथे सुमारे 22 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे.
सोमवारी सकाळच्या सुमारास दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हजेरी लावली होती. यावेळेस त्यांनी अलिबाग ते रेवस दरम्यान असलेल्या मापगाव- सतिर्जे येथील सुमारे 90 गुंठे जमीन खरेदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, या जागेची किंमत सुमारे 22 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये जागेवर दोन बंगले असून नारळ सुपारीची बाग देखील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
[Video] Deepika Padukone and Ranveer Singh spotted at Alibaug register office pic.twitter.com/yvFk9COrbH
— Deepika Padukone FC (@DeepikaPFC) September 13, 2021
दीपिका आणि रणवीर यांच्या अलिबाग येथील जमीन खरेदीमुळे आणखी एका सेलिब्रिटीच्या जागेचा समावेश झाला आहे. अलिबाग तालुक्यातील किहिम, मांडवा या परिसरामध्ये अनेक सेलिब्रिटी, क्रिकेटपटू यांच्या जमिनी असल्याची माहिती आहे. दरम्यान, दीपिका आणि रणवीर हे अलिबाग येथे आल्याची माहिती स्थानिक रहिवाशांना मिळताच अनेकांनी दुय्यम निबंधक कार्यालय जवळ दीपिकाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण 14 नोव्हेंबर 2018 ला लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या 'विला डेल बालबिअॅनेलो' (villa del balbianello) या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये 'दीपवीर'चा शाही विवाहसोहळा पार पडला. रणवीर-दीपिकाचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र असे फक्त 40 जणच या लग्नाला उपस्थित होते. दोघांची प्रेम कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला : रामलीला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. सेटवर काम करताना दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही. त्यानंतर बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा चित्रपटांमध्ये दोघे एकत्र दिसले