(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हरभजन सिंगचं सिल्वर स्क्रीनवर पदार्पण, 'फ्रेंडशिप' सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार
हरभजन सिंगने यापूर्वी 'मुझसे शादी करोगी', 'भज्जी इन प्रॉब्लम' आणि 'सेकंड हँड हसबंड' या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
मुंबई : क्रिकेटपटू हरभजन सिंग क्रिकेटचं मैदाना गाजवल्यानंतर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हरभजन ‘फ्रेंडशिप’ या तमिळ चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. हरभजनच्या 41 वाढदिवसानिमित्त शनिवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज केले आहे.
हरभजन सिंगने यापूर्वी 'मुझसे शादी करोगी', 'भज्जी इन प्रॉब्लम' आणि 'सेकंड हँड हसबंड' या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. मात्र आता भज्जी मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. टफेंड स्टुडिओ लिमिटेडने हरभजनसोबतच्या आपल्या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी केली होती.
हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषेत रिलीज होणार 'फ्रेंडशिप'
या चित्रपटामध्ये दक्षिण भारतीय अभिनेता अर्जुन, लोसलिया मारियानेसन आणि सतीश यांनी देखील काम केले आहे. जॉन पॉल राज आणि शाम सूर्य यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याची निर्मिती किरण रेड्डी मंडाडी आणि राम माद्दुकुरी यांनी केली आहे.
'फ्रेंडशिप' यावर्षी हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषेत रिलीज होणार आहे. हरभजन सिंग हा भारतीय क्रिकेटमधील एक उत्कृष्ट फिरकीपटू मानला जातो. भज्जीने 103 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात 417 विकेट घेतल्या आहेत. हरभजन सिंगने 236 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 विकेट घेतल्या आहेत.