लष्करी अधिकारी ते अभिनेता असा प्रवास केलेले विक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनाने निधन
Coronavirus: लष्करी अधिकारी ते अभिनेता असा प्रवास केलेले विक्रमजीत कंवरपाल (Bikramjeet kanwarpal) हे कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल झाले होते.
मुंबई : भारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झालेले आणि नंतर अभिनय क्षेत्रात आलेले अभिनेते विक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना झाल्यानंतर त्यांना गेल्या दोन आठवड्यापूर्वी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते 54 वर्षांचे होते.
कसम, मर्डर 2, पेज 3, आरक्षण, हेट स्टोरी अशा अनेक मालिका-चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता.
विक्रमजीत कंवरपाल हे अभिनेते तर होतेच. पण त्यापूर्वी ते सैन्यामध्ये कार्यरत होते. काही काळ सैन्यात घालवल्यानंतर त्यांनी तिथून निवृत्ती घेतली होती आणि ते अभिनयाकडे वळले होते. 2003 पर्यंत ते सैन्यात होते. सिनेमा, मालिका आणि वेबसीरीज अशा तीनही व्यासपीठांमधून ते काम करत होते. स्पेशल ऑप्स, श्रीकांत बशीर आदी अनेक वेबसीरीजमध्ये ते झळकले होते. शिवाय, साहो, पेज 3, गाझी अटॅक, 2 स्टेट्स, पाप, हिरोईन, कार्पोरेट आदी अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले होते. आगामी भौकाल या वेबसीरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. अभिनय करतानाच सैन्याचा गाढा अनुभव असल्यामुळे इतर अभिनेत्यांना अभिनयासाठी सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठीही कंवरपाल यांना पाचारण करण्यात येत असे.
विक्रमजीत कंवरपाल यांच्या आकस्मात निधनाच्या बातमीमुळे हिंदी सिने-मालिका वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या :