(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर, लॉरेन्स बिश्नोईसह अटक कलेल्या आरोपींविरोधातही मुंबई पोलिसांची कारवाई
Salman Khan : सलमान खान गोळबार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Salman Khan : काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर गोळीबार झाला होता. त्यानंतर या प्रकरणाचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी काही तासांतच या प्रकणातील सर्व आरोपींना अटक देखील केली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.
फरार आरोपी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईसह पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींविरोधातही आरोपपत्र दाखल केलं आहे. सलमान खानच्या घरावर एप्रिल महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर बिष्णाई गँगकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली. यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनीही याच प्रकरणात एक आरोपपत्र दाखल केलं आहे.
सलमान खानच्या घरावर झाला होता गोळीबार
मुंबईतील वांद्रेमध्ये अभिनेता सलमान खानच्या घरावर आरोपींनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी 72 तासांमध्ये आरोपींच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. सागर पाल आणि विकी गुप्ता अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याआधी बिहारमध्ये सराव केला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
सलमानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे होते आदेश
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याच्या आरोपींना सूचना देण्यात आलेल्या. मात्र, आरोपींनी 5 गोळ्या फायर केल्यात आणि 17 राऊंड आम्ही जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
सलमानच्या घरात गोळी
या गोळीबारातील एक गोळी सलमान खानच्या घरात घुसली असल्याचे समोर आले. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने गॅलरीमध्ये कुणी नव्हतं, गॅलरी रिकामी होती. पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातील एक गोळी गॅलरीतील पडद्यातून आरपार गेली आणि भिंतीवर लागली असल्याचे समोर आले.