ND Studio : नितीन देसाईंच्या जाण्याने शांत झालेल्या एनडी स्टुडिओत पुन्हा एकदा 'अॅक्शन'चा आवाज, 'या' मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात
ND Studio : नितीन देसाई यांच्या जाण्यानंतर शांत झालेल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओ हा पुन्हा एकदा बहरला आहे. एका मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाला एनडी स्टुडिओमध्ये सुरुवात झाली आहे.
ND Studio : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्याच एनडी स्टुडीओमध्ये (ND Studio) आत्महत्या केली. नितीन देसाईंच्या अचानक जाण्याने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या 58 व्या वर्षी एनडींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर शांत झालेला एनडी स्टु़डिओ आता पुन्हा एकदा गजबजला आहे. कारण एनडी स्टुडीओमध्ये सध्या एका मराठी सिनेमाचं शुटिंग सुरु करण्यात आलं आहे.
सिनेमा किंवा मालिकांमधील भव्य आणि प्रशस्त सेटसाठी दिग्दर्शकांची कायमच पसंती ही कर्जतमधील एनडी स्टुडीओला राहिली आहे. अनेक सिनेमांचं शुटींग या एनडी स्टुडीओमध्ये झालं आहे. पण नितीन देसाईंच्या जाण्याने शांत झालेल्या एनडी स्टुडीओमध्ये आता पुन्हा एकदा अॅक्शन या आवाजाचे सूर घुमू लागले आहेत. स्नेहल तरडे दिग्दर्शित, प्राजक्ता माळी निर्मिती फुलवंती या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एनडींच्या जाण्यानंतर फुलवंती हा पहिला सिनेमा त्यांच्या स्टुडिओमध्ये चित्रत होत आहे.
फुलवंतीच्या निमित्ताने एनडी स्टुडिओ पुन्हा बहरला - स्नेहल तरडे
दरम्यान दिग्दर्शिका स्नेहल तरडेनी महाराष्ट्र टाईम्ससोबत संवाद साधताना याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी तिने म्हटलं की, दिग्दर्शिका म्हणून माझ्या पदार्पणाचं काम मी एनडी स्टुडीओमध्ये सुरु केलं आहे. नितीन देसाईंच्या जाण्यापूर्वी एक आठवडा आधी त्यांची आणि माझी भेट झाली होती. खरंतर आमची तशी ओळख नव्हती. पण प्रवीण आणि त्यांनी पूर्वी एकत्र काम केलं होतं. त्यामुले प्रवीण मला एनडी स्टुडिओमध्ये घेऊन आला आणि माझी त्यांच्यासोबत ओळख करुन दिली.
हा माझा पहिलाच सिनेमा असल्याचं मी त्यांना सांगितलं होतं. तेव्हा अगदी आनंदात त्यांनी मला विश्वासानं म्हटलं की, काय हवं नको ते बिनधास्त सांगा आमची पूर्ण टीम तुमच्यासाठी, मराठी सिनेमासाठी हजर आहे. ही मराठी कलाकृती असल्यामुळे जेव्हा बजेटचा मुद्दा आला तेव्हा चर्चा झाल्यानंतर त्यांनी हवी ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. पण दुर्दैवाने आमची ती भेट पहिली आणि शेवटची ठरली. त्याचप्रमाणे त्यांचे शब्दही. त्यानंतर अगदी आठवडाभरातच ते गेले. हा स्टुडिओ म्हणजे त्यांचं स्वप्न आहे. फुलवंतीच्या निमित्ताने ते पुन्हा बहरतंय, याचा जास्त आनंद वाटतोय.