‘मराठी सिनेसृष्टीतही कास्टिंग काऊच’, गिरीजा ओक,कांचन अधिकारींचा गौप्यस्फोट
एबीपी माझावरील 'माझा विशेष' चर्चेत मराठी चित्रपट अभिनेत्री गिरीजा ओक आणि चित्रपट निर्मात्या कांचन अधिकारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई : अभिनेत्री डेझी इराणी यांच्यावर बेतलेल्या बलात्काराच्या प्रसंगाच्या अनुषंगानं, एबीपी माझावरील 'माझा विशेष' चर्चेत मराठी चित्रपट अभिनेत्री गिरीजा ओक आणि चित्रपट निर्मात्या कांचन अधिकारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतही कास्टिंग काऊच प्रकार होतात, हे त्यांनी जाहीरपणे मान्य केलं आहे. यामुळे आतापर्यंत चांगल्या मानल्या जाणाऱ्या मराठी सिनेजगताचा हाही चेहरा समोर आला आहे.
आतापर्यंत बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. पण आता मराठी सिनेसृष्टीतही असे प्रकार घडत असल्याचं पहिल्यांदाच मान्य करण्यात आलं आहे.
'माझा विशेष'मध्ये नेमकं काय म्हणाल्या कांचन अधिकारी आणि गिरीजा ओक?
कांचन अधिकारी : मराठी सिनेसृष्टीत कास्टिंग काऊच होतं...
गिरीजा ओक : होतं.. होतं... अगदीच होतं. हल्लीच आलेला एक अनुभव आहे. माझ्या एका नाटकात काम करणाऱ्या मुलाला मी सांगत होते की, एका टेलिव्हिजन शोसाठी कास्टिंगची गरज आहे. या-या वयोगटातील तुझ्या ओळखीची कुणी मुलगी आहे का?
तर त्याने मला पटकन प्रश्न विचारला की, कॉम्प्रोमाईज की नो कॉम्प्रोमाईज? त्यावेळी मला नक्की कळलं नाही की तो काय बोलला... मी त्याला बाजूला घेऊन विचारलं की, म्हणजे काय? तर तो म्हणाला की, अशा दोन प्रकारच्या मागण्या होतात. म्हणजे वयोगट, दिसणे आणि ती मुलगी कॉम्प्रोमाईज करायला तयार आहे की नाही हे देखील ती मेन्शन करते. जर ती कॉम्प्रोमाईज करणाऱ्यातील नसेल तर तिला बोलवलं जातच नाही. जर कॉम्प्रोमाईज करणाऱ्यातील असेल तर तिला बोलवलं जातं.
Video :
माझा विशेष