Bollywood in Coronavirus : कोरोना महामारीचा बॉलिवूडला मोठा फटका, 2021 मध्ये आतापर्यंत फक्त 50 कोटीची कमाई
बॉलिवूडचा सर्वात खराब क्वार्टर 2020 चा पहिला क्वार्टर होता. त्या तिमाहीत बॉलिवूड कलेक्शन केवळ 780 कोटी रुपये होते. तान्हाजी - अनसंग वॉरियरने 2020 च्या पहिल्या तिमाहीत 280 कोटींची कमाई केली.
मुंबई : कोरोना महामारीचा फटका बॉलिवूडलाही बसला आहे. हजारो कोटींची उलाढाल असलेल्या बॉलिवूडसाठी 2020 नंतर 2021 वर्षही निराशाजनक आहे. बॉलिवूड 2000 सालापासूनच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. 2021 चे पहिले तीन महिने संपले आहेत. यावर्षी केवळ रुही (Roohi) चित्रपटाने 25 कोटी कमावले आहेत. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर मुंबई सागाचा (Mumbai Saga) क्रमांक लागतो. ज्याचे बॉलिवूड कलेक्शन 15 कोटी आहे.
याखेरीज आणखी बरेच चित्रपट आले ज्यांना 2 कोटींची कमाई देखील करता आली नाही. आतापर्यंत 2021 च्या पहिल्या तिमाहीत बॉक्स ऑफिसवर फक्त 50 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. बॉलिवूडच्या इतिहासात आतापर्यंत असे कधी झाले नव्हते. म्हणजेच, नवीन शतकाच्या सुरूवातीस, 2000 पासूनचा हा सर्वात वाईट काळ आहे.
यापूर्वी बॉलिवूडचा सर्वात खराब क्वार्टर 2020 चा पहिला क्वार्टर होता. त्या तिमाहीत बॉलिवूड कलेक्शन केवळ 780 कोटी रुपये होते. तान्हाजी - अनसंग वॉरियरने 2020 च्या पहिल्या तिमाहीत 280 कोटींची कमाई केली. त्यानंतर बागी 3, स्ट्रीट डान्सर 3 डी आणि शुभ मंगल ज्यादा सावधान सारख्या चित्रपटांचा 780 कोटींच्या कलेक्शनमध्ये मोठा वाटा होता.
2019 चा पहिला क्वार्टर बॉलिवूडच्या सर्वोत्तम क्वार्टरपैकी एक होता. 2019 चा पहिला तिमाही उरी - द सर्जिकल स्ट्राइक, केसरी, टोटल धमाल, गली बॉय, लुका चप्पी, मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी आणि बदला यासारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांनी गाजवला. 2019 च्या पहिल्या तिमाहीत 1103 कोटी रुपयांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं. 2019 च्या पहिल्या तिमाहीची ही मालिका संपूर्ण वर्षभर चालू होती आणि 2019 मध्ये एकूण 4400 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं होतं.
दुर्दैवाने 2020 मार्चनंतर कोरोनाचं संकट सुरु झालं ते आजही सुरु आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीची सुरुवात खराब झाली आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकललं गेलं आहे. सूर्यवंशी, बंटी और बबली- 2 यासारख्या चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. सूर्यवंशी चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता.
दरम्यान, सलमान खानने असेही म्हटले आहे की कोरोनामुळे महाराष्ट्रात घातलेल्या निर्बंधांमुळे त्यांचा राधे-तुम्हारा मोस्ट वांटेड भाईचा नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यास पुढे ढकलले जाऊ शकते. सध्या त्याची रिलीजची तारीख 13 मे आहे म्हणजेच आगामी ईद. फेसबुक लाइव्ह सत्रादरम्यान सलमान खान म्हणाले की, कोरेनाची प्रकरणे कमी होतील तेव्हाच राधे 13 मे रोजी थिएटरमध्ये येऊ शकतील.