(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऋषी कपूर यांच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ लीक; रूग्णालय करणार चौकशी
ऋषी कपूर यांचा शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो त्यांचा अंतिम व्हिडीओ असल्याचा दावा देखील सोशल माध्यमांवर केला जात आहे. सदर प्रकरणी सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रूग्णालय चौकशी करणार आहे.
मुंबई : सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रूग्णालयामधून ऋषी कपूर यांचा शेवटच्या क्षणांचे काही व्हिडीओ लिक झाले होते. ते त्यांच्या अंतिम क्षणांचे व्हिडीओ असल्याचा दावा देखील सोशल माध्यमांवर केला जात आहे. त्यासंदर्भात रूग्णालयाने शुक्रवारी एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये रूग्णालयाने अभिनेते ऋषी कपूर यांच्या सोशल मीडियावर लीक झालेल्या व्हिडीओंची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे.
रूग्णालयाच्या फेसबुकवरील अधिकृत पेजवर एक पोस्ट लिहिण्यात आली आहे. त्यामध्ये 'सर एच एन रिलायंस फाउंडेशन रूग्णालयाच्या मॅनेजमेंटचा एक संदेश. आयुष्यभरासाठी सन्मान.' या पोस्टमध्ये पुढे लिहिण्यात आलं आहे की, 'आम्हाला माहिती मिळाली आहे की, आमच्या रूग्णालयात दाखल असलेल्या एका रूग्णाचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. सर एच एन रिलायंस फाउंडेशन रूग्णालयातील रूग्णांची गोपनियता आणि त्यांचं खासगी आयुष्य आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा निषेध करत आहोत. रूग्णालयातील व्यवस्थापन या घटनेची चौकशी करणार आहे. तसेच या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.'
अभिनेते ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं आहे. त्यानंतर त्यांच्या अंतिम क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे रूग्णालयाने सदर प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा व्हिडीओ : आर के स्टुडिओशी ऋषी कपूर यांचं अनोखं नातं
व्हायरल झालेल्या व्हिडीओंपैकी एका व्हिडीओमध्ये पुजारी यांच्यासोबत दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरही दिसत आहे. ज्यामध्ये हे दोघेही ऋषी कपूर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, ऋषी कपूर यांचं पार्थिव स्ट्रेचरवर रूग्णालयातून बाहेर काढून अंतयात्रेसाठी एका व्हॅनमध्ये ठेवलं जातं होतं. याप्रकारचे इतरही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
संबंधित बातम्या :