Bastar Teaser : लिबरल, डाव्या विचारवंताना भरचौकात गोळ्या घालणार! अदा शर्माच्या 'बस्तर'च्या टीझरने नवा वाद?
Bastar Teaser : या चित्रपटाच्या टीझरमध्ये नक्षलवाद्यांवर टीका करताना अदा शर्मा साकारत असलेली व्यक्तीरेखा उदारमतवादी, डाव्या विचारांच्या लोकांना भरचौकात गोळ्या घालू असे वक्तव्य करताना दिसत आहे.
Bastar Teaser : वर्ष 2023 मध्ये वादग्रस्त ठरलेला 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटातील अदा शर्मा (Adah Sharma), सुदिप्तो सेन आणि विपुल शाह यांचे त्रिकूट पुन्हा एकदा परतले आहे. शहरी नक्षलवाद, नक्षलवादाच्या मुद्यावर भाष्य करणाऱ्या बस्तर या चित्रपटाचा टीझर वादाच्या भोवऱ्या अडकण्याची चिन्हे आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये नक्षलवाद्यांवर टीका करताना अदा शर्मा साकारत असलेली व्यक्तीरेखा उदारमतवादी, डाव्या विचारांच्या लोकांना भरचौकात गोळ्या घालू असे चिथावणीखोर वक्तव्य करताना दिसत आहे.
राजकीय वादाला फोडणी ?
'बस्तर' चित्रपटाचा 1 मिनिट आणि 15 सेकंदाचा टीझर लाँच करण्यात आला. यातून निर्माते पुन्हा एकदा त्यांच्या चित्रपटाने राजकीय वाद निर्माण करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. टीझरमध्ये अदा शर्माची व्यक्तिरेखा नक्षलवाद्यांच्या नावाने दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला (JNU) नक्षलवाद्यांचा सहानुभूतीदार म्हणते आणि डाव्या विचारांच्या समर्थकांना, उदारमतवाद्यांना भर चौकात रस्त्यावर गोळ्या झाडण्याबद्दल बोलत आहे.
टीझरची सुरुवात आयपीएस अधिकारी नीरजा माधवनच्या व्यक्तिरेखेने होते, जी अदा शर्माने साकारली आहे. यानंतर, सुमारे 1 मिनिटाच्या एकपात्री प्रयोगात, ती नक्षलवाद्यांच्या विरोधात कोणत्याही किंमतीत जाऊन त्यांना समूळ नष्ट करण्याबद्दल बोलते. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे.
जेएनयू, नक्षलवादी, उदारमतवाद्यांवर निशाणा
चित्रपटाच्या टीझरमध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठ हे नक्षलवाद्यांचे सहानुभूतीचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरातील नक्षल समर्थक, उदारमतवादी आणि डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांनादेखील लक्ष्य करण्यात आले आहे.
टीझर व्हिडिओमध्ये अदा शर्मा एका सैनिकाच्या लूकमध्ये आहे. ती म्हणते, 'पाकिस्तानसोबतच्या 4 युद्धात आमचे 8738 जवान शहीद झाले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की नक्षलवाद्यांनी आपल्या देशात 15,000 जवानांची हत्या केली आहे? बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी आमच्या 76 जवानांची निर्घृण हत्या केली. आणि त्यानंतर जेएनयूमध्ये जल्लोष करण्यात आला. कल्पना करा, आपल्या देशाचे असे प्रतिष्ठित विद्यापीठ आपल्या सैनिकांच्या हौतात्म्याचा उत्सव साजरा करत आहे. असा विचार कुठून येतो? हे नक्षलवादी बस्तरमध्ये भारताचे तुकडे करण्याचा कट रचत आहेत आणि मोठ्या शहरांमध्ये बसलेले डावे उदारमतवादी खोटे विचारवंत त्यांना साथ देत असल्याचे अदा शर्माचे पात्र म्हणते.
पाहा बस्तर चित्रपटाचा टीझर