(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Katta Atul Parchure : कर्करोगाला भिडले, संकटांना गाडले; अतुल परचुरे, डॉ. देशपांडेंनी अचंबित कहाणी 'माझा कट्ट्या'वर उलगडली
Atul Parchure : अतुल परचुरे यांनी कर्करोगावर मात केली असून त्यांच्या या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी 'माझा कट्ट्या'वर उलगडली आहे.
Majha Katta Atul Parchure : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे आणि प्रेक्षकांच्या आयुष्यात विनोदाला जिवंत ठेवणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul parchure) काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अतुल यांनी कर्करोगावर (Cancer) मात केली असून त्यांच्या या जिद्दीची आणि संघर्षाची कहाणी 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) उलगडली आहे. कर्करोगावर मात करायची हे परचुरे यांनी पहिल्याच दिवशी ठरवलं होतं.
कर्करोगाचं निदान झाल्याचं अतुल परचुरे यांना कसं कळलं?
कर्करोगाचं निदान झाल्याचं अतुल परचुरेंना कसं कळलं याबद्दल बोलताना ते म्हणाले,"ऑक्टोबरमध्ये लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्याने आम्ही न्यूझीलंडला फिरायला गेलो होतो. तिथे पोहोचल्यानंतर मला कळलं की, काही खाण्याची इच्छा होत नाही आहे. माझ्यासाठी खावंसं न वाटणं ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे काहीतरी गडबस असल्याचा मला संशय आला. पण त्यावेळी कुटुंबियांना मी काही सांगितलं नाही. भारतात परत आल्यानंतरही काही खाण्याची इच्छा होत नव्हती. पुढे एका डॉक्टर मित्राच्या सांगण्यानुसार अल्ट्रा सोनोग्राफी केली. त्यावेळी त्याचा चेहरा पाहूनच मला वाटलं काहीतरी गडबड आहे. पुढे ट्यूमर झाल्याचं कळलं".
अतुल परचुरे पुढे म्हणाले,"डॉक्टरांनी मला सांगितलं तेव्हा मी एकटाच होतो. घरच्यांना कळवण्याची जबाबदारी माझी होती. घरच्यांना कळल्यानंतर नक्कीच त्यांना धक्का बसला असेल पण मी आजारी आहे अशी त्यांनी कधी जाणीव करू दिली नाही. पण या अडीच महिन्यांच्या काळात मी ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होतो त्यांनी मला एकदाही जगण्याची आशा दाखवली नाही. मुंबईतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू होते. आपला ओळखीचा चेहरा असूनही आपल्याबाबतीत असं घडू शकतं तर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत काय घडत असेल याची कल्पनाही करू शकत नाही. पुढे सेकंड ओपिनियन घेण्याचं ठरवलं.
देशपांडे डॉक्टरांसाठी परचुरेंची केस कशी होती?
पुण्यातील डॉक्टर शैलेश देशपांडे (Dr. Shailesh Deshpande) यांच्याकडे अतुल परचुरे उपचार घेत होते. अतुल परचुरेंच्या केसबद्दल बोलताना डॉक्टर म्हणाले,"अतुल परचुरे जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा त्यांची अॅक्टिव्ह ट्रीटमेंट सुरू झालेली नव्हती. अतुल परचुरेंची केस माझ्यासाठी क्लिन आणि क्लिअर केस होती. ते ज्यादिवशी माझ्याकडे आले त्या दिवशीच मी त्यांना जगण्याची आशा दाखवली".
ट्रॅफिकच्या आवाजावरुन किती वाजले असीतील हे मला कळू लागलं : अतुल परचुरे
अतुल परचुरे म्हणाले,"मंगल केंकरे, महेश मांजरेकर, शरद पोंक्षे या सर्वांनी देशपांडे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली होती. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी मी देशपांडे डॉक्टरांची भेट घेतली. डॉक्टरांकडे गेलो तो दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यादिवशी आपण कर्करोगातून मुक्त होऊ असा एक विश्वास मिळाला. डॉक्टरांकडे गेलो तेव्हा माझे पाय सुजले होते, मला मांडी घालून बसता येत नव्हतं. बोलता बोलता घशाला कोरड पडायची. प्रत्येक घासासोबत पाणी पिल्याशिवाय मला अन्न खाली जात नव्हतं. दोन महिन्यातच वजन कमी झालं. रात्र-रात्र मला झोप येत नसे. नंतर-नंतर ट्रॅफिकच्या आवाजावरुन किती वाजले असीतील हे मला कळू लागलं. उठून चालत जाणं ही अॅचिव्हमेंट वाटायची".
अतुल परचुरे पुढे म्हणाले,"कर्करोगावर मात करायची हे मी पहिल्याच दिवशी ठरवलं होतं. अनेक मित्र सावलीसारखे माझ्यासोबत होते. नकारात्मक विचार येत होते. पण चुकीच्या गोष्टी लोकांसमोर ठेऊन जायच्या नाहीत, असा माझा विचार होता. त्यामुळे कर्करोगावर मात करण्याचा मी निर्णय घेतला. 56 वर्ष आपल्याला काहीच झालं नाही आणि आता मीच का? असा प्रश्न मला कधीच पडला नाही. गेल्या ऑक्टोबरपासून आजपर्यंत मी नीट जेवण केलेलं नाही. काम करता येत नव्हतं याचं वाईट वाटलं. पण लवकरच मी प्रेक्षकांच्या भेटीला येईल".
संबंधित बातम्या