Anurag Kashyap: 'वांद्रे ते जुहू... तू फक्त बोट दाखव...'; अनुराग कश्यपला बोनी कपूरनी दिलेली लग्झरी ऑफर; काय घडलेलं नेमकं?
दिग्दर्शक होण्यापूर्वी अनुरागने राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ (1998) साठी सह-लेखन केले होते, आणि हाच त्यांचा करियर टर्निंग पॉइंट ठरला.

Anurag Kashyap: ‘गँग्स ऑफ वासेपुर’ आणि ‘ब्लॅक फ्रायडे’सारख्या कल्ट क्लासिक्ससाठी ओळखले जाणारा दिग्दर्शक अनुराग कश्यप ( Anurag Kashyap) याने नुकतीच त्याच्या सिनेमातील प्रवासातील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. भारतीय सिनेमात त्याचा प्रवास जितका दमदार, तितकाच चढ-उतारांनी भरलेला आहे. अनेकांना माहीतही नसते की अनुराग कश्यप यांचा दिग्दर्शनातील पहिला प्रयोग ‘पांच’ (2003) हा चित्रपट सेन्सॉरमधील अडथळ्यांमुळे थिएटरपर्यंत पोहचूच शकला नाही. दिग्दर्शक होण्यापूर्वी अनुरागने राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ (1998) साठी सह-लेखन केले होते, आणि हाच त्यांचा करियर टर्निंग पॉइंट ठरला.
बोनी कपूरची ‘लक्झरी’ ऑफर
‘गेम चेंजर्स’वर कोमल नाहटा यांच्याशी बोलताना अनुरागने एक जुना किस्सा सांगितला. निर्माता बोनी कपूर त्यांच्या लेखन-शैलीवर इतके प्रभावित झाले होते की त्यांनी एक अविश्वसनीय ऑफर दिल्याचं अनुरागने सांगितलं..अनुराग म्हणाला ,"बोनी कपूर एकदा म्हणाले होते, ‘एक फिल्म बनव ना... बांद्राहून जुहूपर्यंत कुठल्याही इमारतीकडे बोट दाखव, मी तुला तिथे फ्लॅट घेऊन देतो.’"हसत अनुराग पुढे म्हणाला ,"मला वाटलं, फिल्म रिलीज होण्याआधी फ्लॅट देतोय तर रिलीज झाल्यावर तर कदाचित बंगला देईल!"
‘पांच’ निघाली असती तर मी वेगळा माणूस असतो..
अनुराग कश्यप यांनी सांगितले की ‘पांच’ ही फिल्म त्यांच्या करियरचं दिशा बदलणारी ठरली असती.‘पांच’ रिलीज झाली असती तर आज मी वेगळा माणूस असतो. मी नवीन कलाकारांसोबत फिल्म केली होती, सिद्ध करायला की फक्त कथा आणि कथन महत्त्वाचं असतं,स्टार नाहीत. पण ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि ‘वासेपुर’ नंतरही मी हे सिद्ध करू शकलो नाही. आणि आता मी ते सिद्ध करण्याचा हट्ट सोडून दिला आहे."
‘पांच’ हा चित्रपट पुण्यातील जोशी-अभ्यंकर सिरीअल किलिंग्स (1976–77) वर आधारित होता. चित्रपटातील हिंसा, भाषा आणि ड्रग्सच्या सीन्सवर CBFC ने आक्षेप घेतला आणि चित्रपट थांबवला गेला. मात्र वर्षानुवर्ष ‘पांच’ ऑनलाईन कल्ट स्टेटस मिळवत गेला आणि अनुराग कश्यप यांना धाडसी कथाकथनकार म्हणून ओळख मिळाली.
अनुराग कश्यपची नवी फिल्म , "निशानची"
अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि सहलेखित नवीन क्राइम ड्रामा ‘निशानची' 19 सप्टेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटातून ऐश्वर्या ठाकरे यांनी बबलू आणि डबलू या जुळ्या भावांची भूमिका साकारत अभिनयाची सुरुवात केली आहे. वेदिका पिंटो, मोनिका पवार, मोहम्मद झिशान अय्यूब, कुमुद मिश्रा आणि विनीत कुमार सिंहही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.
ही फिल्म 2000 च्या दशकातील भारतातल्या गुन्हेगारी आणि विश्वासघाताच्या कथा उलगडते. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची वाटचाल कमजोरच ठरली. पहिल्या दिवशी फक्त ₹0.25 कोटींची कमाई, आणि 12 दिवसांत जवळपास ₹1.3–1.4 कोटी अशी एकूण कमाई नोंदली गेली.























