Anupam Kher : चित्रपट चांगला असेल तर कोणी काहीही करू शकत नाही"; पठाणच्या यशानंतर अनुपम खेर यांचं मोठं वक्तव्य
Anupam Kher : अनुपम खेर यांनी नुकतचं बॉयकॉट 'पठाण' आणि सध्या चित्रपटगृहात सिनेमाला मिळालेलं यश अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
Anupam Kher On Shah Rukh Khan Pathaan : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एका मुलाखतीत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) सिनेमावर भाष्य केलं आहे. नुकतचं एका मुलाखतीत ते म्हणाले,"एखाद्या ट्रेंडचा सिनेमा पाहण्यावर किंवा न पाहण्यावर फरक पडत नाही.जर तुम्हाला त्या सिनेमाचा ट्रेलर आवडला असेल आणि त्यावरुन सिनेमा पाहण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो सिनेमा आवर्जून पाहता. सिनेमा चांगला असेल तर कितीही अडथळे आले तरी तुम्ही तो सिनेमा पाहता".
अनुपम खेर पुढे म्हणाले,"प्रेक्षकांनी सिनेमावर कधीही बहिष्कार टाकलेला नाही. कोरोनाकाळात सर्व जण घरी होते. 100 वर्षांनंतर असं काही घडलं होतं. त्यावेळी मनोरंजनासाठी प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा अवलंब केला. ओटीटीवर त्यांनी अनेक चांगले सिनेमे पाहिले. कोरोनाकाळात देखील प्रेक्षक सिनेमापासून दुरावले नाहीत".
बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाने इतिहास रचला आहे. या सिनेमाने सिनेमा चांगल्या दर्जाचा असेल तर त्याला मार्केटिंगची आवश्यकता नाही हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे आता सिनेमा चांगला असेल तर सिनेप्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळतातच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई (Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection)
यशराज फिल्म्सचा 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा नवनवे रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे. रिलीजच्या 12 दिवसांत या सिनेमाने जगभरात 832.2 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतातदेखील या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. भारतात हा सिनेमा 500 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या काही दिवसांत 'पठाण' हा सिनेमा प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
'पठाण' हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत असल्याने त्याच्यासाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा होता. सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना शाहरुखने मात्र या सिनेमाचं प्रमोशन केलं नाही. पण तरीही चाहत्यांनी पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन लाडक्या सेलिब्रिटीचा अॅक्शन पॅक सिनेमा पाहण्याची पसंती दर्शवली.
संबंधित बातम्या