Veer Murarbaji : शिवराज्याभिषेक दिनी 'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा' सिनेमाची घोषणा; 17 फेब्रुवारीला सिनेमा होणार प्रदर्शित
Veer Murarbaji : 'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Veer Murarbaji : शिवराज्याभिषेक दिनी 'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा' (Veer Murarbaji) या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा 17 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
अठरापगड जाती-जमातीच्या शूर मावळ्यांना सोबत घेत शिवरायांनी जाज्वल्य इतिहास घडविला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडद्यावर येणार आहे.
View this post on Instagram
17 फेब्रुवारी 2023 ला सिनेमा होणार प्रदर्शित
'वीर मुरारबाजी ...पुरंदरची युद्धगाथा' हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या सिनेमाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ सिनेमाच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांची आहे.
'वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा' भव्यदिव्य सिनेमा
1665 च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे निवडक सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम केला. पुरंदरच्या लढाईतल्या पराक्रमाने मुघलांना भयभीत करुन सोडणाऱ्या मुरारबाजी देशपांडे यांची ही यशोगाथा आजच्या पिढीला सिनेमाच्या माध्यमातून समजावी यासाठी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘पावनखिंड’ सारखा 'वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा' सिनेमादेखील भव्यदिव्य असणार आहे.
संबंधित बातम्या