(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amitabh Bachchan Statue : ‘महानायका’वरील प्रेम तर पाहा! अमेरिकेतील भारतीय कुटुंबाने घरातच उभारला ‘बिग बीं’चा पुतळा
Amitabh Bachchan Statue : न्यू जर्सीच्या एडिसन सिटीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या घरात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan statue) यांचा मोठ्या आकाराचा पुतळा बसवला आहे.
Amitabh Bachchan Statue : मनोरंजन विश्वाचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे चाहते केवळ भारतातच नाहीत, तर जगभरात पसरलेले आहेत. अमिताभ बच्चन यांची क्रेझ आता वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. चाहते आपल्या लाडक्या कलाकारांसाठी काहीही करायला तयार असतात. काही लोक आपल्या आवडत्या कलाकाराला सतत भेटवस्तू पाठवतात किंवा काही चाहते कलाकारांच्या नावाचे टॅटू वैगरे काढतात. मात्र, आता ‘बिग बीं’चे चाहते असलेल्या एका कुटुंबाने चक्क त्यांचा पुतळा घरात उभारला आहे. एका भारतीय कुटुंबाने त्यांच्या अमेरिकेतील घराबाहेर 60 लाख रुपये खर्चून अमिताभ बच्चन यांचा पुतळा तयार केला आहे. सध्या त्यांचा हा भव्य पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. अमिताभ बच्चन यांच्या या पुतळ्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि हा पुतळा पाहण्यासाठी आता चाहत्यांची गर्दी जमत आहे.
न्यू जर्सीच्या एडिसन सिटीमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाने त्यांच्या घरात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan statue) यांचा मोठ्या आकाराचा पुतळा बसवला आहे. इतकेच नाही तर, मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्यासाठी एखाद्या देवाप्रमाणे असल्याचे या कुटुंबाचे म्हणणे आहे. शिवाय, अमिताभ बच्चन यांच्या पुतळ्याची किंमत ऐकूनही लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पाहा फोटो :
फोटो शेअर करताना गोपी सेठ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, 'आम्ही एडिसन एनजे यूएसएमधील आमच्या नवीन घराबाहेर शनिवारी 27 ऑगस्ट रोजी अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारला. बच्चन यांच्या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांचे अनेक चाहते उपस्थित होते.’
अमिताभ बच्चन आम्हाला देवासमान!
भारतीय कुटुंब अमेरिकेतील न्यू जर्सीच्या एडिसन शहरात स्थायिक झाले आहे. मात्र, अमेरिकेत गेल्यावरही त्यांच्या मनातून अमिताभ बच्चन यांची क्रेझ कमी झालेली नाही. सेठ कुटुंबीय अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे चाहते आहेत, म्हणूनच या कुटुंबाने त्यांच्या घराबाहेर इतकी महागडी मूर्ती उभारली आहे. हे कुटुंब या मूर्तीची देवाप्रमाणेच पूजा करत आहे.
एडिसन सिटीमध्ये राहण्याऱ्या रिंकू सेठ आणि गोपी सेठ यांनी शनिवारी या पुतळ्याचा उद्घाटन समारंभ आयोजित केला होता, ज्यात त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह अमेरिकेत स्थायिक झालेले 600 भारतीय लोक उपस्थित होते. यावेळी एका काचेच्या पेटीत ठेवलेल्या अमिताभ बच्चन यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याशिवाय भरपूर फटाकेही फोडण्यात आले. अमिताभ बच्चन यांचा हा पुतळा 'कौन बनेगा करोडपती'च्या होस्टच्या स्टाईलमध्ये दिसत आहे.
संबंधित बातम्या