एक्स्प्लोर
पद्मावती आणि मस्तानीसाठी मी भन्साळींची पहिली पसंत : ऐश्वर्या
'भन्साळी माझ्यासाठी बाजीराव शोधू शकले नाहीत, आणि नंतर त्यांना माझ्यासाठी खिल्जीही मिळाला नाही' असं ऐश्वर्या म्हणाली.

मुंबई : 'पद्मावत' चित्रपटातील राणी पद्मावती आणि 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील मस्तानीच्या भूमिकेत आपण दीपिका पदुकोणला पाहिलं. दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये दीपिका चपखल बसत असल्याच्या भावना तिच्या चाहत्यांनी व्यक्त केल्या. मात्र या व्यक्तिरेखेसाठी दीपिका पहिली चॉईस नसल्याचं समोर आलं आहे. 'पद्मावत' आणि 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दोन्ही चित्रपटांसाठी आधी आपल्याला विचारणा केली होती, असा दावा अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने केला आहे. 'स्पॉटबॉय' वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने हे दोन्ही चित्रपट आपल्याला आधी ऑफर झाल्याचं सांगितलं. 'शेवटी तुम्हाला कास्टिंग बघावं लागतं. कलाकारांची निवड तुमच्या मनासारखी नसेल, तर काही गोष्टी जुळून येत नाहीत. संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याची इच्छा होती. कारण आम्हा दोघांनाही एकत्र काम करायला आवडतं. आता बघुया कधी जमतंय' असं ऐश्वर्या म्हणाली. 'भन्साळी माझ्यासाठी बाजीराव शोधू शकले नाहीत, आणि नंतर त्यांना माझ्यासाठी खिल्जीही मिळाला नाही' असं ऐश्वर्या म्हणाली. 'बाजीराव मस्तानी'च्या भूमिकेत रणवीर-दीपिका हे बॉलिवूडमधील सध्याचं हिट कपल होतं, तर 'पद्मावत' सिनेमातही दीपिकासोबत रणवीर सिंग अल्लाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत होता, मात्र दोघांचा एकही एकत्र सीन नव्हता. दोन्ही सिनेमात दीपिकासोबत रणवीरच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. बाजीराव मस्तानी चित्रपटात ऐश्वर्या आणि सलमान खान यांना एकत्र आणण्याचा भन्साळींचा मानस होता, मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही. ऐश्वर्या इतक्या वर्षांनंतरही सलमानसोबत काम करण्यास तयार नसल्याचं दिसून येतं. यापूर्वी ऐश्वर्या राय बच्चन आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी हम दिल दे चुके सनम (1999), देवदास (2002), गुजारिश (2010) या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.
आणखी वाचा























