(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Naseeruddin Shah Hospitalized : बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह रुग्णालयात दाखल
Naseeruddin Shah Hospitalized : अनेक समांतर चित्रपटातून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : 70 दशकातील बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नसिरुद्दीन शाह यांची पत्नी रत्ना पाठक शाह यांनी एबीपी न्यूजशी बोलताना माहिती दिली की, "नसिरुद्दीन शाह यांना न्युमोनिया झाला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे." रत्ना पाठक शाह यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "त्यांच्या फुफ्फुसात न्युमोनियाचा एक पॅच आढळून आला आहे. त्यावरील उपचारांसाठी त्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नाही. तसेच त्यांना कोविडी किंवा इतर कोणताही आजार नाही."
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या 70 वर्षीय नसिरुद्दीन शाह यांना मुंबई खार येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिथे दिलीप कुमार यांना दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना मंगळवारी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील विश्वसनिय सुत्रांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिलीप कुमार यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. याव्यतिरिक्त एका कौटुंबिक सदस्यानं दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांचं हिमोग्लोबिन कमी झालं आहे. त्यांचं वाढलेलं वय आणि इतर परिस्थिती पाहता, त्यांच्या तपासण्या करण्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु, चिंतेचं कोणतंही कारण नसल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
नसिरुद्दीन शाह यांचे सेक्रेटरी जयराज यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "डॉक्टर नसिरुद्दीन शाह यांच्यावर उपचार करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना आणखी एक-दोन दिवस रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार आहे. त्यांना पूर्ण बरं वाटल्यानंतरच रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्यात येणार आहे. नसिरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टर त्यांना डिस्चार्ज कधी द्यायचा यासंदर्भात निर्णय घेतील."
महत्त्वाच्या इतर बातम्या :