Pathaan : 57 वर्षांचा किंग खान! 30 वर्षांपेक्षा अधिक काळ सिनेविश्वात कार्यरत; आजही चाहत्यांमध्ये शाहरुख खानची क्रेझ
Shah Rukh Khan : गेल्या 30 वर्षांपासून शाहरुख खान प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आजही त्याची क्रेझ कायम आहे.
Shah Rukh Khan Pathaan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या तीन दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. एकीकडे शाहरुखच्या आगामी 'पठाण' (Pathaan) सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना दुसरीकडे मात्र चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
गेल्या 30 वर्षांपासून एका पेक्षा एक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शाहरुख खान गेली चार वर्ष रुपेरी पडद्यापासून लांब होता. पण आता 'पठाण'च्या माध्यमातून तो पुन्हा एकदा चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. 'किंग खान'चा 2018 साली प्रदर्शित झालेला 'झिरो' (Zero) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला होता. त्यानंतर थेट चार वर्षांनी शाहरुख रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.
'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई!
'पठाण' (Pathaan) या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला 20 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. रिलीजआधीच हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. यशराज फिल्म्सच्या 'वॉर' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड केला होता. रिलीजआधी या सिनेमाचे 4.05 लाख तिकीटांची विक्री झाली होती. तर आता बादशाहच्या 'पठाण'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आपली जादू दाखवत 'वॉर'चा रेकॉर्ड मोडला आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'पठाण'च्या 4.19 लाख तिकीटांची विक्री झाली आहे.
'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडण्यास 'पठाण' सज्ज
अॅडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत 'बाहुबली 2' (Baahubali 2) या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. रिलीजआधी या सिनेमाच्या 6.50 लाख तिकीटांची विक्री झाली होती. तर दुसरीकडे 'केजीएफ 2' या सिनेमाच्या 5.15 लाख तिकीटांची विक्री झाली होती. त्यामुळे दिवसा अखेरीस 'पठाण' हा सिनेमा 'केजीएफ 2'चा (KGF 2) रेकॉर्ड मोडू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सिने विश्लेषक गिरीश वानखेडे यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे,"रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'पठाण' या सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल्ल होणार असून रेकॉर्डब्रेक कमाई करण्यास सिनेमा सज्ज झाला आहे".
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत थिएटर मालक मनोज देसाई म्हणाले,"सकाळी 9 वाजल्यापासून या सिनेमाचे शो दाखवले जाणार आहेत. शाहरुखचा मोठा चाहतावर्ग असल्याने त्याचा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करणार आहेत. सिंगल स्क्रीन थिएटरमध्येदेखील हा सिनेमा दाखवला जाणार आहे".
संबंधित बातम्या