बॉलिवूडमधला मराठमोळा दिग्दर्शक हरपला, दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन
निशिकांत कामत यांना गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते. 31 जुलै रोजी कामत यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
हैदराबाद : प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचं वयाच्या 50 व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेता रितेश देशमुख याने याबाबत ट्वीट करत माहिती दिली. सकाळपासूनच निशिकांत कामत यांच्या निधनाचं वृत्त प्रसारित आणि प्रकाशित झालं होतं. त्यानंतर हैदराबादच्या एआयजी रुग्णालयाने याचं खंडन करत दुपारी एकच्या सुमारास निशिकांत कामत यांच्या प्रकृतीसंदर्भात मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केलं होतं. निशिकांत कामत सध्या व्हेंटिलेटवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र निशिकांत यांची मृत्यूशी झूंज अखेर संपली आहे.
I will miss you my friend. #NishikantKamat Rest In Peace. ???????? pic.twitter.com/cqEeLbKJPM
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 17, 2020
निशिकांत कामत यांना गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते. 31 जुलै रोजी कामत यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
सकाळपासून निशिकांत कामत यांच्या निधनाचं वृत्त प्रसारित झाल्यानंतर रितेश देशमुखने ट्वीट करत निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर अजून ते जिवंत असून लढत असल्याचं सांगितलं होतं. यानंतर निशिकांत कामत यांच्या प्रकृतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
निशिकांत कामत यांचा सिनेसृष्टीतील प्रवास
पाच वर्षापूर्वी निशिकांत कामत यांनी अजय देवगन आणि तब्बू यांच्यासोबत 'दृष्यम', इरफान खानसोबत 'मुंबई मेरी जान' आणि 'मदारी', जॉन अब्राहमसोबत 'फोर्स' आणि रॉकी हँडसम' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. मराठी चित्रपटांमध्ये 'डोंबिवली फास्ट' व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन 'लय भारी', 'फुगे' या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'सातच्या आत घरात' हा मराठी चित्रपट लिहिण्याव्यतिरिक्त त्यांनी या चित्रपटात अभिनय देखील केला होता.
हिंदी चित्रपटांमध्ये विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित 'भावेश जोशी' आणि 'रॉकी हँडसम' या सिनेमांतही निशिकांत कामत यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या. 2022 मध्ये रिलीज होणार्या 'दर-ब-दर' या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ते तयारी करत होते.