Bollywood Director Story: बडे बडे सुपरस्टार्स 'या' दिग्दर्शकाला घाबारायचे, त्याच्यासमोर शूट करताना थरथराचे दिग्गज; ओळखलं का कोण?
Bollywood Director Story: हृषिकेश मुखर्जी यांचा सिनेमा म्हणजे, मध्यमवर्गीय भारतीय जीवनाचा आरसा. त्यांचे चित्रपट सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या आनंद आणि आव्हानांशी झुंजण्याची कहाणी सांगायचे.

Bollywood Director Story: जेव्हा भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांबाबत बोललं जातं, ज्यांनी कथा केवळ रुपेरी पडद्यावर आणल्या नाहीत, तर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात त्या रुजवल्या, तर त्यावेळी ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं.
30 सप्टेंबर 1922 रोजी कोलकाता इथे जन्मलेल्या या चित्रपटसृष्टीच्या जादूगारानं त्यांच्या चित्रपटांमध्ये साधेपणा आणि संवेदनशीलता दाखवली. ज्यामुळे केवळ मनोरंजनच झालं नाही तर, जीवनातील खोल वास्तवांचा शोधही घेतला गेला. आनंद, गोलमाल, मिली आणि चुपके चुपके या गाजलेल्या सिनेमांमधून त्यांनी सिद्ध केलं की, सिनेमा म्हणजे, केवळ ग्लॅमर नाही, तर समाजाचा आरसा आहे. भावना आणि आनंद यांचा मेळ आहे.
हृषिकेश मुखर्जी यांचा सिनेमा म्हणजे, मध्यमवर्गीय भारतीय जीवनाचा आरसा. त्यांचे चित्रपट सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या आनंद आणि आव्हानांशी झुंजण्याची कहाणी सांगायचे. 'आनंद' मधील जीवन आणि मृत्यूमधील मार्मिक वाद असो किंवा 'गोलमाल'ची हलकीफुलकी विनोदी शैली, त्यांच्या प्रत्येक चित्रपटात एक खोल संदेश लपलेला होता, ज्यामुळे प्रेक्षकांना हसायला, रडायला आणि विचार करायला भाग पाडलं.
समाजाचा आरसा असणारे सिनेमे करणारा दिग्दर्शक (Hrishikesh Mukherjee Life Story)
हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शनात प्रवेश करून राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन सारख्या स्टार्सना नव्या उंचीवर नेलं. 'आनंद'मधील राजेश खन्ना यांचा उत्साह आणि 'अभिमान'मधील अमिताभ बच्चन यांचा शांत, सालस स्वभाव त्यांच्या दिग्दर्शनाचे परिणाम दाखवतो. प्रमुख स्टार आणि किरकोळ पात्रांना समान महत्त्व देण्याची त्यांची क्षमता हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, ज्यामुळे त्यांचे चित्रपट एक संपूर्ण अनुभव बनलेत. आणि आजच्या पिढीलाही भूरळ घालतायत.
पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी हृषिकेश मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आलंय. 'द वर्ल्ड ऑफ हृषिकेश मुखर्जी' या त्यांच्या चरित्रात त्यांच्या दिग्दर्शनाची प्रतिभा दाखवणाऱ्या चित्रपटातील एक मनोरंजक किस्सा आहे. हा किस्सा सुपरस्टार धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर आणि ओम प्रकाश यांच्या मुख्य भूमिका असलेल्या त्यांच्या कल्ट कॉमेडी चित्रपट 'चुपके चुपके'च्या शूटिंगमधील आहे.
धर्मेंद्र, अमिताभ यांच्यासोबत काय घडलेलं? (Director Hrishikesh Mukherjee Story)
सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. सगळेजण ठरल्याप्रमाणे सेटवर पोहोचले, सीन्स शूट करायला सुरुवात झाली. दिग्दर्शकाच्या खुर्चीवर हृषिकेश मुखर्जी बसलेले. पण, त्यावेळी मात्र त्यांचं लक्ष सीनवर नव्हतं, ना स्टार्सवर... ते रमलेले बुद्धीबळाच्या डावात. पुढची चाल काय खेळू? याचा विचार करत ते बराच वेळ विचार करत बसले होते. तर दुसरीकडे सुपरस्टार धर्मेंद्र, अमिताभ बच्चन सेटवर उभे होते. दोघेही वाट पाहत होते, दिग्दर्शकाच्या सुचनांची की, नेमकं करायचंय काय? पण हृषिकेश मुखर्जी रमलेले बुद्धीबळाच्या डावा.
अखेर धर्मेंद्र, अमिताभ बच्चन वैतागले... स्वतःहून काही करावं, तर उगाच सीन खराब व्हायला नको... दोघांनी हिंमत केली आणि हृषिकेश मुखर्जींकडे गेले आणि ,विचारलं काहीच सुचना नाही दिल्यात, शुटिंग कसं करू? त्यांना सीनमध्ये काही बदल हवेत का?
ऋषिकेश मुखर्जींनी बुद्धीबळाच्या पटावरची आपली चाल खेळली आणि मग हसत हसत मोठ्या आवाजात उत्तर दिलं की, "जर तुम्हाला कहाणी कळाली असती, तर तुम्ही अभिनेते नाही, दिग्दर्शक असता... चला या इकडे, जे लिहून दिलंय ते करा..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























