(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बहिण- भावांना कंगना रनौतकडून कोट्यवधींच्या लक्झरी फ्लॅटचं खास गिफ्ट
कंगना बहुविध कारणांनी चर्चेत आली ज्यानंतर आता म्हणे बी टाऊनच्या या क्वीननं तिच्या भावंडांना एक खास भेट दिली आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही मागील बऱ्याच दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. नायालयीन फेरा म्हणू नका किंवा मग शिवसेनेसोबत सुरु असणारा वाद म्हणू नका. कंगना बहुविध कारणांनी चर्चेत आली ज्यानंतर आता म्हणे बी टाऊनच्या या क्वीननं तिच्या भावंडांना एक खास भेट दिली आहे.
कंगनाचं तिची बहीण रंगोली आणि इतरही चुलत भावंडांसमवेत एक खास नातं आहे. भावंडांप्रती असणाऱ्या याच प्रेमापोटी कंगनानं त्यांना आलिशान घरं भेट दिली आहेत. चंदीगढमध्ये कंगनानं एका आलिशान वस्तीमध्ये त्यांना ही घरं खरेदी करुन दिली आहेत.
टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कंगनानं ही लक्झरी घरं खरेदी करण्यासाठी एक- दोन नव्हे तर तब्बल 4 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही घरं विमानतळ, काही मॉल्स आणि चांगल्या रेस्तराँच्या नजीक आहेत अशीही माहिती समोर येत आहे. कंगनानं भावंडांना दिलेलं हे गिफ्ट खऱ्या अर्थानं मौल्यवान आहे असं म्हणायला हरकत नाही.
कंगनाभोवती वादांचं वलय...
कंगना ही कायमत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि त्याहूनही अनेकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अनेकांचाच रोष ओढवतो. राजकीय मतंही ठामपणे मांडणआरी ही अभिनेत्री अनेकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधताना दिसते. तर, प्रस्थापितांवरही तिनं कायमच तोफ डागलेली असते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुनही तिचा अभिनेता, गायक दिलजित दोसांज आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राशी वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
एकिकडे विविध मुद्द्यांवर मतप्रदर्शन केल्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही अभिनेत्री दुसरीकडे तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीतही व्यग्र आहे. येत्या काळात कंगना 'थलैवी', 'धाकड' आणि 'तेजस' या चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.