BMC Election 2026: भाजपकडून लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला संधी, मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरवलं, अनेकांच्या भुवया उंचावल्या
भाजपकडून जाहीर करणाऱ्या अनुभवी नगरसेवक आणि उमेदवारांच्या ताफ्यात मनोरंजन विश्वातील अभिनेत्रीचं नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

BMC election 2026: राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा उडणार असून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2026) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मुंबईत कोणाचा महापौर? याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला वेग आला आहे. भाजपने आपल्या 66 उमेदवारांची पहिली अनौपचारिक यादी समोर आणली असून रविवारी रात्री काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत. यात लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री निशा परुळेकर (Nisha Parulekar) यांचा समावेश आहे. भाजपकडून जाहीर करणाऱ्या अनुभवी नगरसेवक आणि उमेदवारांच्या ताफ्यात मनोरंजन विश्वातील अभिनेत्रीचं नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Nisha Parulekar: कोण आहेत अभिनेत्री निशा परुळेकर?
अभिनेत्री निशा परुळेकर या प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. भरत जाधव यांच्यासोबत ' सही रे सही' यासारख्या तुफान नाटकात त्यांनी काम केलं आहे. तसेच महानायक व शिमणा या दोन चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. शिवाय महेश कोठारे व्हिजन निर्मित दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईचे पात्र साकारले होते. अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतला आहे. रंगमंचावर, तसेच मोठ्या व छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर आता अभिनेत्री निशा परुळेकर राजकारणाच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत. अभिनेत्री निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. भाजपकडून त्या महापालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजप सांस्कृतिक प्रकाशच्या सहसंयोजक म्हणून सध्या त्या भाजपमध्ये काम करत आहेत.
View this post on Instagram
नव्या चेहऱ्याला भाजपकडून उमेदवारी
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागावाटपाची खलबतं सुरू होती. भाजपने ज्या जागांवर एक मत झालं आहे अशा जागांवर वेळ न दवडता उमेदवारांना मैदानात उतरवलं. उमेदवारांना दादरच्या पक्ष कार्यालयात बोलवत एबी फॉर्म सोपवण्यात आला. भाजपने पहिल्या 66 उमेदवारांची यादी समोर आणली असून या यादीत अनेक वजनदार नावांचा समावेश आहे. जुन्या जाणत्या नगरसेवकांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे. याच नावांमध्ये अभिनेत्री निशा परुळेकर यांच्यासारख्या नवीन चेहऱ्याला भाजपने उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सगळ्या महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल. मुंबई महापालिकेची निवडणूक एकूण 227 प्रभागांसाठी होत आहे.























