800 खिडक्या 900 दारं ! बिग बॉसच्या घराची झलक समोर, बेडरूममध्ये यंदा मोठा बदल, स्पर्धकांना मिळणार टेलिफोन?
11 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होत असून, घराचं दार उघडताच कोणते नवे ट्विस्ट, कोणते वाद आणि किती ड्रामा रंगणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’ची दारं अखेर आज उघडणार आहेत. बिग बॉस सुरू होण्याआधीच कलर्स मराठीने बिग बॉसच्या घराची पहिली शेअर केली आहे. ही झलक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. “यंदाचं घर नेमकं कसं असणार?” हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. अखेर हे गुपित उघडलं असून, यंदाचं घर केवळ मोठं नाही, तर भन्नाट ट्विस्ट्स आणि ड्रामाने भरलेलं ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या घरात गार्डन एरिया, बाल्कनी, प्रशस्त लिव्हिंग रूम, किचन, वॉशरूम परिसर, बेडरूम, कॅप्टन रूम यांसह जिम आणि स्विमिंग पूलसाठी स्वतंत्र जागा देण्यात आली आहे. म्हणजेच, एका आलिशान रिसॉर्टसारखं हे घर दिसत असलं तरी, आत शिरल्यावर शांतता टिकेल याची शाश्वती मात्र नाही!
बिग बॉसच्या घरात बेडरूममध्ये नवा ट्विस्ट
यंदाचा सर्वात मोठा आणि चर्चेचा ट्विस्ट म्हणजे घरात पहिल्यांदाच दाखल झालेले बंक बेड्स. वर झोपणारा स्पर्धक आपलं सामान कुठे ठेवणार? जागेवरून वाद होतील का? अशा अनेक प्रश्नांनी आधीच वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे, या बंक बेड्समुळे संपूर्ण बेडरूममध्ये काय चाललं आहे, हे प्रत्येकाला दिसणार आहे. घरात प्रवेश करताच बंक बेड कोण निवडणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात यंदा टेलिफोन?
यंदाच्या सीझनमध्ये आणखी एक नवा आकर्षण म्हणजे टेलिफोन नावाची स्टोअर रूम. अशा प्रकारचा प्रयोग बिग बॉस मराठी मध्ये यापूर्वी कधीच पाहायला मिळाला नव्हता. या खोलीत प्रत्यक्षात टेलिफोन असणार की केवळ स्पर्धकांना गोंधळात टाकण्यासाठी केलेला हा प्रकार आहे याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत सध्या तरी सस्पेन्स कायम आहे. हा फोन संवादासाठी वापरला जाणार की वाद वाढवण्यासाठी, हे येणाऱ्या भागांतच कळणार आहे.
घराच्या सजावटीबाबत बोलायचं झालं तर, तब्बल 800 खिडक्या आणि 900 दारांनी सजलेलं हे घर पाहून प्रेक्षकही चकित झाले आहेत. कॅप्टन रूमला खास लॅव्हिश लूक देण्यात आला असून, दर आठवड्याला जो स्पर्धक कॅप्टन बनेल, त्यालाच या रॉयल रूममध्ये राहण्याची संधी मिळणार आहे.
आजपासून सुरू होणार बिग बॉस
दरम्यान, 11 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होत असून, घराचं दार उघडताच कोणते नवे ट्विस्ट, कोणते वाद आणि किती ड्रामा रंगणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार असून, हा शो दररोज रात्री 8 वाजता प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. एकंदरीत, यंदाचा सीझन म्हणजे फुल ऑन मसाला असणार, यात शंका नाही!























