Rana Daggubati | राणा डग्गुबती रिलेशनशिपमध्ये, गर्लफ्रेण्डसोबतचा फोटो शेअर!
भल्लालदेव अर्थात राणा डग्गुबातीने गर्लफ्रेण्डसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची गुड न्यूज दिली.
मुंबई : बाहुबली चित्रपटातील 'भल्लालदेव' अर्थात राणा डग्गुबातीचं रिलेशनशिप स्टेटस आता कमिटेड झालं आहे. सोशल मीडियावर गर्लफ्रेण्डचा फोटो शेअर करत रिलेशनशिपमध्ये अडकल्याचं त्याने जाहीर केलं. राणा डग्गुबातीने या फोटोला "आणि तिने होकार दिला" असं कॅप्शन देऊन हार्ट शेप इमोजीही टाकला आहे.
मिहीका बजाज असं राणाच्या गर्लफ्रेण्डचं नाव असून ती देखील हैदराबादमध्येच राहते. मिहीका बजाज ही ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओची मालकीण आहे. लॉकडाऊननंतर दोघांच्या लग्नाची तारीख ठरवली जाणार आहे.
View this post on Instagram
35 वर्षीय राणा डग्गुबातीने फोटो शेअर करताच तेलुगू आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील चिरंजिवी, श्रुती हसन, तमन्ना, समंथा यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. तसंच सोनम कपूर, अनिल कपूर, नील नितीन मुकेश, कुबरा सैत, बिपाशा बासू, कियारा अडवाणी या बॉलिवूड कलाकारांनीही राणाचं अभिनंदन केलं.
राणा लवकरच विष्णू विशालसह 'काडन' या चित्रपटात झळकणार आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे हा चित्रपट खोळंबला आहे. तसंच 'नंबर 1 यारी विद राणा सीझन' या चॅट शोमधून त्याने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. यासोबतच राणाने हाऊसफुल्ल 4, दम मारो दम, बेबी अशा हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. त्याचे वडील दग्गुबाती सुरेश बाबू हे तेलुगु चित्रपट निर्माते आणि वितरक आहेत.
हैदराबादमध्ये जन्मलेली मिहीका बजाज ही सुरेश आणि बंटी बजाज यांची मुलगी आहे. तसंच ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ या इव्हेंट कंपनीची ती मालकीण आहे. तिची आई क्रसला ज्वेलर्सची संचालक आणि क्रिएटिव्ह हेड आहे.
दरम्यान यापूर्वी राणा डग्गुबातीचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. मात्र त्यानेही कधी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र काल अचानक त्याने गर्लफ्रेण्डसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची गुड न्यूज दिली.