अक्षय खन्नाच्या त्या डान्सनंतर सगळंच बदललं! FA9LA गाण्याच्या swagने धुमाकूळ घातला; सिंगरने सांगितली इनसाइड स्टोरी
अक्षय खन्नानं बीट फील करताच सगळं बदललं. गाण्यामुळेच चित्रपटाची क्रेझ अधिक वाढली आहे. FA9LA गाणं सध्या लोकांच्या ओठांवर असून, जितकं कौतुक अक्षय खन्नाचं होत आहे

Dhurandhar FA9LA Song: चित्रपट ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. दमदार स्टारकास्ट, संगीत, दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अभिनयामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सगळ्यात सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता अक्षय खन्ना आणि हिप-हॉप आर्टिस्ट फ्लिपराचीच्या FA9LA (फासला) या गाण्याची. गाण्यातील अक्षय खन्नाची एंट्री, त्याचा स्वॅग आणि सहजसुंदर डान्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अक्षय खन्नाचा हा इम्प्रोव्हाइज्ड डान्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून, गाण्यामुळेच चित्रपटाची क्रेझ अधिक वाढली आहे. FA9LA गाणं सध्या लोकांच्या ओठांवर असून, जितकं कौतुक अक्षय खन्नाचं होत आहे, तितकीच दाद गायक फ्लिपराचीला मिळताना दिसतेय.
फ्लिपराची काय म्हणाला?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फ्लिपराचीने FA9LA गाण्याच्या यशाबद्दल आणि अक्षय खन्नाच्या डान्सबद्दल मोकळेपणानं भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला,“मी लवकरच अक्षय खन्नापासून प्रेरित होऊन एक TikTok व्हिडीओ बनवणार आहे. त्यांनी गाण्यात कमाल केली. शूटला आले आणि स्वतःचं बेस्ट दिलं. त्यांनी बीट फील केली आणि म्हणाले, ‘चलो, डान्स करूया’. प्रोड्यूसर्सशी बोलून त्यांनी गाण्यात तो डान्स जोडला. ती एंट्री, तो डान्स आणि ती वाइब या गाण्यासाठी अगदी परफेक्ट होती.”
फ्लिपराची पुढे म्हणाला, “मी अक्षय खन्नाचा मनापासून आभारी आहे. हा गाणं 9 महिने किंवा वर्षभर आधी रिलीज झालं होतं, पण योग्य वेळी, योग्य अभिनेत्यासोबत आणि योग्य चित्रपटात वापरलं गेलं. सगळं इतकं अचूक प्लॅन करण्यात आलं की अपेक्षित इम्पॅक्ट तयार झाला. लोकांना लिरिक्स पूर्ण समजले नसले तरी त्यांनी स्वतःचे शब्द तयार करून गाणं एन्जॉय केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे मला आणखी म्युझिक तयार करण्याची प्रेरणा मिळाली.”
म्युझिक ही आंतरराष्ट्रीय भाषा
बहरीनमधील गायक फ्लिपराचीने सांगितलं की,“माझं म्युझिक भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात वाजत आहे, ही भावना अवर्णनीय आहे. यावरून सिद्ध होतं की म्युझिक ही एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे. लिरिक्स समजले नाहीत, तरीही साउंड आणि वाइबमधून लोकांपर्यंत पोहोचता येतं. फक्त सातत्य ठेवणं आणि रिस्क घ्यायला तयार असणं महत्त्वाचं आहे.” उल्लेखनीय म्हणजे, FA9LA हे मूळ बहरीनी गाणं असून, त्याचं संगीत DJ Outlaw यांनी दिलं आहे आणि गायक फ्लिपराची आहे. ‘धुरंधर’मधील या गाण्यामुळे अक्षय खन्ना नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आला असून, सिनेप्रेमींमध्ये त्याची चर्चा जोरात सुरू आहे.























