सैराटमध्ये काम करण्यापूर्वी आकाश ठोसर होता पैलवान, मंजुळेंनी 15 दिवसात 8 किलो वजन कमी करायला सांगितलं VIDEO
Akash Thosar : सैराटमध्ये काम करण्यापूर्वी आकाश ठोसर होता पैलवान, मंजुळेंनी 15 दिवसात 8 किलो वजन कमी करायला सांगितलं VIDEO

Akash Thosar : मराठी चित्रपटसृष्टीत 2016 साली आलेल्या 'सैराट' या चित्रपटाने इतिहास घडवला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समाजातील प्रतिष्ठेच्या नावाने होणाऱ्या हिंसेचा अत्यंत वास्तवदर्शी आणि हृदयाला भिडणारा चित्रपट प्रदर्शित केला. सैराट ही एक केवळ प्रेमकथा नव्हे, तर ती ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक वास्तव उघड करणारी जिवंत लवस्टोरी आहे.
चित्रपटात 'परश्या' ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसरचा प्रवास देखील तितकाच प्रेरणादायी आहे. आकाश ठोसरला सिनेक्षेत्रात कोणतीही पार्श्वभूमी नव्हती, ना कुठले थिएटर प्रशिक्षण. मात्र नागराज मंजुळे यांनी शोधून त्याला संधी दिली आणि 'परश्या'मुळे आकाश ठोसर घराघरात पोहोचला.
दरम्यान, नागराज मंजुळे यांनी शोधलेला परश्या म्हणजे आकाश ठोसर सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी कुस्तीचा सराव करत होता. नागराज मंजुळे यांनी त्याला वजनही कमी करण्यास सांगितलं होतं. याबाबतचा खुलासा दोघांनी स्वत: केला होता.
नागराज मंजुळे आकाश ठोसराबाबत म्हणाले होते की, परश्या गोरा हवा होता, त्याप्रमाणेच आकाश ठोसर दिसत होता. माझ्या मोठ्या भावाने मला त्याचे फोटो पाठवले होते. मला त्याचे फोटो इंटरेस्टिंग वाटले. मात्र, तो जाडजुड होता. चेहऱ्यावर अॅक्टिव्हपणा नव्हता. तो फार डल वाटायचा. पहिल्यांदा भेटला तेव्हा पुढारी टाईपचा खादी शर्ट घालून आला होता. त्याचं वजन जास्त होतं. काही करुन दाखवं म्हटलं की तो घाबरायचा. त्यामुळे मी त्याला कुस्तीबाबत बोलू लागलो. मी त्याला सांगितलं की, वजन कमी करावं लागेल. 8 ते 10 किलो वजन कमी करावं लागेल. त्यानंतर त्याने 10 ते 15 दिवसांत ते 7 ते 8 किलो वजन कमी केलं.
आकाश ठोसर म्हणाला होता की, मी एका लग्नात गेलो होतो. मी साईडला बसलो होतो. त्यावेळी भूषण दादाचा फोन आला होता की, तुला नागराज मंजुळेंनी ऑडिशनला बोलावलं. नागराज मंजुळेंनी वजन कमी करायला सांगितल्यानंतर माझ्या मनात कायम तेच होतं. मी सकाळी चारला उठायचो. 14 किलोमीटर रनिंग करायचो. खाण्यावर कंट्रोल करायचो.
‘सैराट’मध्ये परश्या हा एक गरीब मच्छीमार समाजातील मुलगा. तो त्याच्या वर्गातील श्रीमंत घरातील आर्चीवर प्रेम करतो. हे प्रेम, ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर उभं राहतं. परश्याचा प्रेमातील संयम, त्याची निष्ठा, आणि नंतरच्या टप्प्यावर त्याने घेतलेली जबाबदारी – हे सर्व आकाश ठोसरने इतक्या नैसर्गिक पद्धतीने साकारलं की, प्रेक्षकांनी परश्या ही व्यक्तिरेखा अक्षरशः आपल्या हृदयात साठवून ठेवली.
आकाश ठोसरची अभिनयशैली सैराटमध्ये फारच प्रभावी होती. त्याचे डोळे खूप बोलके होते. परश्याच्या पहिल्या प्रेमाची ओढ, त्यातील निरागसता, आणि नंतरच्या घटनांमुळे आलेला परिपक्व भाव – हे सर्व आकाशने फारच सच्चेपणाने उभं केलं. त्याच्या सादरीकरणामुळे ‘सैराट’ ही कथा फक्त चित्रपटापुरती न राहता, ती प्रेक्षकांच्या आयुष्यातील एक अनुभव बनली.
सैराट फक्त आकाश ठोसर किंवा रिंकू राजगुरू यांच्या अभिनयासाठीच नव्हता, तर नागराज मंजुळे यांच्या लेखणीसाठी, अजय-अतुल यांच्या संगीतासाठी आणि ग्रामीण वास्तव दाखवण्याच्या पारदर्शकतेसाठीही लक्षात राहतो. मात्र आकाश ठोसरशिवाय परश्याची भूमिका पूर्णत्वास जाऊ शकली नसती, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
शेवटी एवढंच म्हणता येईल की, सैराट आणि आकाश ठोसर यांचं नातं हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आदर्श उदाहरण आहे. एका नवोदित कलाकाराने आपल्या पहिल्याच भूमिकेतून जे काही साध्य केलं, ते अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























