Abhijeet Bichukale : 'बारामतीची जनता मला निवडून देईलच...',अभिजीत बिचुकलेंनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला
Abhijeet Bichukale : अभिजीत बिचुकले हे बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढवणार असून अजित पवारांविरोधात ते मैदानात आहेत.
Abhijeet Bichukale : राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळीत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या बारामतीच्या मतदारसंघात आता आणखी एक उमेदवार रिंगणात उतरला आहे. अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलाय. याच मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध युगेंद्र पवार (Yugendra Pawar) अशी लढत आहे. काका पुतण्याच्या या हायव्होल्टेज मतदारसंघातून आता अभिजीत बिचुकले देखील निवडणूक लढवणार आहेत.
अभिजीत बिचुकलेंनी लोकसभा निवडणुकांसाठी कल्याणच्या मतदारसंघाची निवड केली होती. या मतदारसंघात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना आव्हान दिलं होतं. पण या निवडणुकीतही अभिजीत बिचुकलेंचा पराभव झाला होता. त्यानंतर आता विधानसभेसाठी अभिजीत बिचुकले अजित पवारांच्या मतदारसंघात लढणार आहेत. अर्ज भरल्यानंतर अभिजीत बिचुकलेंनी एबीपी माझासोबत संवाद साधला.
'बारामतीची जनता मला निवडून देईलच'
एबीपी माझासोबत बोलताना अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं की, मला 2004 पासून ज्या ठिकाणी लढावसं वाटतं त्या ठिकाणी मी येतो आणि लढतो . बारामतीकरांनी मला भरभरुन मतदान करावं, जेणेकरुन त्यांचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधीत्व मी विधानसभेत करेन आणि बारामतीची जनता मला निवडून देईल असा विश्वास आहे.
अनेक निवडणुका लढवल्या, डिपॉझिट म्हणून हजारोंचे चिल्लर भरले
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आपल्या वेगवेगळ्या स्टंट आणि वक्तव्याने ते कायम चर्चेत असतात. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून अनेकदा खुलं आव्हान दिलं आहे. अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी बिचुकलेंना अद्याप यश आलेलं नाही. '2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्यांनी केलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती.