Aaditya Thackeray : 'मला पेंग्विग आणल्याचा अभिमान', भाजपच्याच नेत्याला पेंग्विन म्हणत केली नक्कल; आदित्य ठाकरेंचा रोख कुणावर?
Aaditya Thackeray : ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पेंग्विनच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या टीकेला चोख उत्तर देत भाष्य केलं आहे.
Aaditya Thackeray : देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची लगबग पाहायला मिळतेय. लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) होताच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी उडेल. यातच सध्या सुरु असलेल्या प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये टीकेचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. सत्ताधाऱ्यांकडून प्रत्येक विरोधातील प्रत्येक नेत्यावर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर आता नाही, तर मागील अनेक दिवसांपासून पेंग्विन या मुद्द्यावरुन टीका केली जाते. यावर आता आदित्य ठाकरेंनी नुकतच भाडिपाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी भाडिपा विषय खोल या युट्युब चॅनलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर पेंग्विन या मुद्द्यावरुन होणाऱ्या टीकेला उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय. तसेच मी भारतात पेंग्विन आणल्याचा मला अभिमान असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी चित्त्यांचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला.
मला पेंग्विन आणल्याचा अभिमानच - आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंनी या मुद्द्यावर बोलताना म्हटलं की, मी या मुद्द्यावरुन झालेला टीकेला 2 ते तीन वेळा उत्तर दिलं आहे. एकदा शिवसेनेचच अधिवेशन होतं, त्यामध्येच मी सांगितलं होतं की, मी पेग्विंग आणल्याचा मला अभिमान आहे. कारण प्रत्येक दिवशी, सुरुवातीचे दोन ते तीन वर्ष आहेतच, पण आजही आठवड्यात जवळपास हजारो लोकं त्याला भेट देतात. संपूर्ण राणीची बाग बघायला 100 रुपये तिकीट आहे, त्याचं उत्पन्न आता कोट्यावधी रुपयांच्या घरात गेलं आहे. त्या प्राणीसंग्रहालयाचं उत्पन्न हे तोट्यात होतं, त्या पेंग्विन्जमुळे ते फायद्यात गेलं. आता तेच पेंग्विन लखनऊ प्राणीसंग्रहालय मागतंय, गुजरातमधलही एक प्राणीसंग्रहालय मागतंय. योगायोगाने दोन्हीही भाजपची राज्य आहेत.
पुढे त्यांनी म्हटलं की, 'मला ज्या पेंग्विनवरुन बोललं जातं, एक राजकीय नेते आहेत, पण ते कपडेही त्याच कलरचे घालतात आणि चालतातही तसेच. तुम्हाला आता ते व्यंगचित्र कळलं असलेच, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपच्या नेत्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आहे. मी जे पेंग्विन आणले ते लोकांसमोर आहेत, तुम्ही जे चित्ता आणलेत त्याचं काय झालं हे लोकांना सांगा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकं त्याकडे आकर्षित झाली. आता त्या प्राणीसंग्रहालयात अनेक गोष्टी करण्यात आल्यात, त्यामुळे मला त्या पेंग्विनचा अभिमानच आहे, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.'