Aaditya Narayan Viral Video : चाहत्याला मारलं, मोबाईल हिसकावून फेकला, कॉन्सर्टमध्ये आदित्य नारायण चाहत्यावर भडकला; पाहा व्हिडिओ
Aaditya Narayan Viral Video : गायक आदित्य नारायण याचा सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आदित्य नारायण एका कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांसोबत गैरवर्तन करत असल्याचं दिसत आहे.
Aaditya Narayan Viral Video : बॉलीवूड अभिनेता आणि गायक आदित्य नारायण (Aaditya Narayan) याने त्याचे वडिल उदित नारायण (Udit Narayan) गायकीच्या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. तसेच अनेक सिनेमांमधून देखील तो झळकला आहे. अभिनेता आणि गायक अशी कामं करताना तो अनेकदा सूत्रसंचालनाची देखील भूमिका सांभाळतो. त्याच्या गाण्यांमुळे कायम चर्चेत असणारा आदित्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर आदित्यचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झालाय.
या व्हिडिओमध्ये आदित्य एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या चाहत्यांसोबत गैरवर्तन करत असल्याचं पाहायला मिळत आहे.कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्याच्या हातावार आदित्य नारायणने मारलं त्याचा फोन हिसकावून घेतला आणि तो फेकून दिला. आदित्यच्या या व्हिडिओवर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी त्याची चांगलीच शाळा घेतलीये.
नेमकं काय घडलं?
आदित्य नारायण छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये कॉन्सर्टसाठी गेला होता. त्यावेळी त्याने त्या कॉन्सर्टचे सूत्रसंचालन देखील केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित होते. पण त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. या व्हिडिओमध्ये आदित्य शाहरुख खानच्या डॉन या चित्रपटामधील गाणं गाताना दिसत आहे. पण या गाण्यादरम्यान आदित्यचा संयम सुटला. एक चाहता त्याच्या फोनमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्यावेळी आदित्यचे त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने माईकने त्याच्या हातावर मारलं, नंतर फोन हिसकावून गर्दीत फेकून दिला. मात्र, आदित्य कशामुळे नाराज झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
View this post on Instagram
आदित्यवर नेटकरी संतापले
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी आदित्यची चांगलीच शाळा घेतली. तसेच अनेक जण आदित्यचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करतायत आणि त्याची शाळा देखील घेतायत. यावर एकाने कमेंट केली आहे की, 'आधी त्याने त्याच्या हातावर माईक मारला, नंतर त्याचा मोबाईल हिसकावून फेकून दिला. हा तोच गायक आदित्य नारायण आहे, ज्याला लोकांनी डोक्यावर घेतलंय.' एकाने तो स्वत:ला काय समजतो? असा प्रश्न उपस्थित केलाय. 'आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे? एवढा अभिमान कशाला? त्याच्याच चाहत्यांचा एवढा अनादर?' असे देखील प्रश्न अनेकांनी विचारले आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर लोक त्याच्यावर जोरदार टीका देखील करत आहेत.