Yashomati Thakur : माजी आमदार यशोमती ठाकुरांची नवनीत राणांवर नाव न घेता बोचरी टीका, म्हणाल्या...
Yashomati Thakur : काँग्रेसच्या नेत्या तथा माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
Yashomati Thakur on Navneet Rana अमरावती : काँग्रेसच्या नेत्या तथा माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी मोझरी येथे भाजप उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत डीजेच्या तालावर नृत्य केले, हाच धागा पकडत यशोमती ठाकूर यांनी आता नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी समोर अशा प्रकारे नृत्य करणाऱ्या राणांवरून यशोमती ठाकूर यांनी, हे सर्व काय सुरु आहे..? हे आवडतंय का? असा प्रश्न देखील उपस्थिताना यावेळी केला.
समाजामध्ये जातिवाद करत विभाजन केलं जातंय- यशोमती ठाकूर
अमरावतीत महापरिनिर्वान दिनानिमित्त यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून नया अकोला कडे अभिवादन यात्रा काढण्यात आली. या अभिवादन बाईक आणि कार यात्रेत मोठ्या संख्येने लोकं सहभागी झाले. या अभिवादन यात्रेत आणि समारोहाला कर्नाटकचे सर्वात युवा आमदार प्रदीप ईश्वर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित आहे. यावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाल्या की, समाजामध्ये विभाजन केलं जात आहे. जातिवाद सुरू आहे. दादागिरी करून निवडणूक जिंकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
.... अन्यथा जनता त्यांना याचे उत्तर देईल
आमच्यासाठी आमचा देश संविधान महत्त्वाचे आहे. संविधान कटिबद्ध राहिले पाहिजे. सत्ताधारी मलप्रॅक्टिस करून सत्तेमध्ये आलेत. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र धर्म सांभाळावा. अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून आहे. महाराष्ट्र धर्माला जर तडा गेला तर आम्ही आहोत. आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मरकडवाडीमध्ये त्यांनी बॅलेट पेपरवर का मतदान होऊ दिले नाही? सत्ताधाऱ्यांनी जर चोरी केली नाही तर सोलापुरातील मरकडवाडी बॅलेट पेपरवर मतदान का होऊ दिले नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधी रस्त्यावर उतरतील आम्ही देखील त्यांच्यासोबत राहू. आता काय झमेले होतात हे नंतर लोकांना कळेल. सत्ताधाऱ्यांनी 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचा आश्वासन दिलं ते उद्यापासून द्यायला पाहिजे. अन्यथा जनता त्यांना याचे उत्तर देईल. असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या
हे ही वाचा