Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत कोकणात कोणता फॅक्टर महत्त्वाचा ठरणार? वाचा A टू Z माहिती, किंगमेकर कोण होणार?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: रिफायनरीचा मुद्दा 2019 प्रमाणे पुन्हा अग्रभागी आलाय. रिफायनरी होणार म्हणणारे सामंत सध्या बॅकफुटवर गेल्याचं चित्र आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात प्रचाराचा सूर आता दिसू लागला आहे. ग्रामीण भागातील प्रचार हा कार्यकर्त्यांनी आपल्या शीरावर घेतल्याचं चित्र सध्या हळूहळू दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात कोणता फॅक्टर महत्वाचा ठरणार, जाणून घ्या...
रत्नागिरी जिल्हा
1 ) चाकरमानी मतदानासाठी गावी न आल्यास फटका कुणाला बसणार? एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होत आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्याला 20 नोब्हेंबर रोजी आपल्या मुळगावी येऊन मतदान करणे कसं शक्य होणार आहे? या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला असलेला पाठिंबा इतर पक्षांच्या तुलनेत नक्कीच जास्त आहे. पण, सेनेत झालेलं बंड आणि त्यानंतर होणारी हि निवडणूक महत्त्वाची. कोकणातील ग्रामीण भागात चाकरमानी महत्त्वाची भूमिका बजावतात. पण, यावेळी मात्र एकाच दिवशी राज्यभरात मतदान होतंय. त्यामुळे मुंबई असेल किंवा कोकणात चाकरमानी यांनी मतदान केल्यास न केल्यास कुणाला फटका बसणाप हे पाहावं लागेल. शिवाय, दिवाळी किंवा त्रिपुरारी पौर्णिमेला आलेला चाकरमानी पुन्हा मतदानासाठी येणार का? हा देखील प्रश्नच आहे.
2 ) रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढाऊ असली तरी सहा कदम रिंगणात आहेत. त्यामुळे नेमका कोणता कदम बाजी मारणार? मुख्य बाब म्हणजे योगेश आणि रामदास कदम यांच्याप्रमाणे अनिल परब यांच्यासाठी देखील हि लढाई प्रतिष्ठेची आहे. रामदास कदमांचे बंधु सदानंद कदम यांनी थेट पुतण्याविरोधात प्रचार सुरू केला आहे.
3 ) राजापूर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत यांच्यासाठी त्यांचं राजकीय अस्तित्व पणाला लावणारी लढाई आहे. कारण पडद्यामागून किरण सामंत यांनी कायम काम केलं. किंगमेकर अशी त्यांची ओळख रत्नागिरी जिल्ह्यात राहिली. पण, वजीर थेट राजा होण्यासाठी लढतोय. त्यांच्यासमोर राजन साळवी यांचं तगडं आव्हान आहे. राजापूर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. ठाकरेंना आज देखील या ठिकाणी जनाधार दिसून येतो. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेसाठी राजापुरात विजयाच्या आशेचा किरण किती? हे स्पष्ट होणार आहे.
4 ) रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी मतदार कुणाच्या बाजुनं मतदान करणार? कोकणात मराठा आरक्षणाचा किंवा जातीचं राजकारण किती चालतं? हे स्पष्ट करणारी देखील हि निवडणूक असणार आहे. कारण गुहागर विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेनं कुणबी उमेदवार दिला आहे. आम्ही कुणबी समाजातील उमेदवार दिला असा दावा सध्या शिंदेंच्या शिवसेनेनं केला आहे. त्याचवेळी राजापूरमध्ये उदय सामंत यांनी आपल्या बंधुंसाठी कुणबी वोटबँक उभी करण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा होत आहे. त्यामुळे जातीचं राजकारण किती प्रभावी यासह सामंत यांनी एका दगडात दोन पक्षी मारले का? अशी चर्चा होतेय. त्यामुळे हा मुद्दा देखील महत्तावाचा ठरतोय.
5 ) चिपळूण विधानसभा मतदारसंघात लोकांच्या पैशांवर शरद पवार गटाच्या उमेदवारानं प्रचार सुरू केल्याचा आरोप केला जातोय. कारण, शरद पवार गटाचे प्रशांत यादव हे चिपळूण नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ठेवीदारांचा पैसा निवडणुकीत वापरला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. शिवाय, यादव हे वाशिष्ठी डेअरीचे देखील चेअरमन आहेत. त्यांना मिळालेली देणगी यावरून देखील आरोप प्रत्यारोप केले जात आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये सहकार क्षेत्रातील दोन उमेदवार समोरासमोर असं चित्र आहे. शिवाय, रत्नागिरी आणि सिंधुदर्ग या दोन जिल्ह्यातील एका जागेसाठी दोन पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचवेळी दोन्ही शिवसेना प्रामुख्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा रोल महत्त्वाचा असणार आहे.
6 ) रिफायनरीचा मुद्दा 2019 प्रमाणे पुन्हा अग्रभागी आलाय. रिफायनरी होणार म्हणणारे सामंत सध्या बॅकफुटवर गेल्याचं चित्र आहे. त्यात श्रीकांत शिंदे यांनी देखील पर्यावरणपुरक प्रकल्प आणू असं विधान केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधु याच ठिकाणी लढत आहेत. रिफायनरी भागात कुणबी मतदार जास्त आहे. 2019 मध्ये नाणारच्या प्रकल्प रद्द करत असल्याचं ठाकरे - फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. मधल्या काळात खुप घडामोडी घडल्या. ठाकरेंनी देखील रिफायनरी रद्दची भूमिका घेतल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील त्यात सूर मिळवला आहे. पण, असं असलं तरी रिफारनरीचं समर्थन असणाऱ्या महायुतीत असणाऱ्या भाजपची भूमिका देखील महत्त्वाची आहे. कारण, नारायण राणे रिफायनरी आणणार असं सांगतात.
सिंधुदुर्ग जिल्हा
1 ) कुडाळ विधामसभा मतदारसंघात काय होणार? 2014 साली झालेल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढत निलेश राणे पहिल्यांदा विधानसभेत जाणार का? निलेश राणेंचं राजकीय करिअर पणाला असलेली हि लढाई महत्त्वाची मानली जाते. ठाकरेंच्या शिवसेनेचे वैभव नाईक तिसऱ्यांदा मैदानात आहेत. लोकसभेला याच मतदारसंघातून नारायण राणे राणे यांना तब्बल 26 हजारहून जास्त मताधिक्य होतं. त्यामुळे राजकीय अस्तित्व, पणाला लागलेली प्रतिष्ठा या दृष्टीनं हि निवडणूक महत्त्वाची आहे.
2 ) सावंतवाडी मतदारसंघात भाजपचा पदाधिकारी असलेल्या विशाल परबांची बंडखोरी कुणाला मारक आणि कुणाला तारक? हे पाहावं लागेल. कारण, माझ्या पाठिशी 35 ते 40 हजार मतदार असल्याचा दावा परबांचा आहे. पक्षानं त्यांचं निलंबन केलंय. पण, राणे यांच्या जवळ असलेले परब रवींद्र चव्हाण यांच्या गोटातील मानले जातात. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात लढत चुरशीची आणि कुणाचं पारडं जड माननारी आहे? हे पाहावं लागणार आहे. त्यात दिपक केसरकर या मुरब्बी आणि अनुभवी राजकारण्याला आव्हान देणारे विशाल परब नेमके आहेत तरी कोण? नवखे असलेल्या परबांचं आव्हान नेमकं किती?, कोण बाजी मारणार हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे.
3 ) भाजपचे मतदार ठरणार किंगमेकर? कारण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप केवळ नितेश राणे यांच्या रूपानं एकच जागा मिळाली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे. वरिष्ठांनी आदेश देऊन देखील मोठ्या संख्येनं किंवा मनापासून भाजपचे कार्यकर्ते प्रचारात दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात भाजपचे मतदार यांचं मत निर्णायक असणार आहे.
रायगड जिल्हा
1 ) रायगड जिल्हा हा शेकापचं बालेकिल्ला होता. दरम्यान, सध्या शेकाप तीन जागा लढवत आहे. घरात झालेला कलह, जयंत पाटील यांचा विधानसपरिषदेत झालेला पराभव यामुळे शेकापसमोर राजकीय अस्तित्व राखणं हिच कसोटी आहे.
2 ) मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात 16 तारीखला शरद पवार येत आहेत. त्यामुळे आता पक्ष फुटीनंतर पवारांनी थेट कोकणातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात लक्ष देखील केंद्रीत केलंय.
3 ) पेण विधानसभा - पेण विधानसभा मतदार संघात यंदाची निवडणुक मोठी चुरशीची होणार आहे. 2004 च्या निवडणूकीत काँग्रेस कडून विजयी झालेले आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळ मध्ये कॅबिनेट मंत्री (बंदरे मत्स्य व खारभुमी) राहिलेले रवींद्र पाटील यांना पेण विधानसभेचा हवा तसा विकास करता आला नाही.पनवेलच्या जवळ असलेला हा मतदार संघ आजही अनेक समस्यांच्या विळख्यात सापडलाय त्यामुळें येथून जनतेने 2009 आणि 2014 या निवडणूकीत रवी पाटील यांना पराभव करून शेकापचा धर्यशील पाटिल यांना विधिमंडळात पाठविले. आणि हा काँग्रेसचा बालेकिल्ला शेकापचा ताब्यात गेला.मात्र शेकाप ला देखील या मतदार संघाचा पाहिजे तसा विकास आणि येथील जनतेचे प्रश्न सोडविता आले नाही.पुन्हा 2019 च्या विधानसभेत रवींद्र पाटील आणि धर्यशील पाटील यांच्यात मुख्य लढत होऊन रवींद्र पाटिल यांचा विजय झाला मात्र यावेळी रवींद्र पाटील हे भाजपच्या तिकिटावर या मतदारसंघात निवडून आले. केंद्रात आणि राज्यात या पक्षाचं सरकार असून देखील रविंद्र पाटील यांना या मतदारसंघात विकास काम करता आली नाहीत आजही अनेक प्रश्न या मतदारसंघात प्रलंबित आहेत. मुंबईच्या हाके वर असलेला हा मतदारसंघ अजूनही रोजगारासाठी कोणत्याही संधी तरुणांना देऊ शकला नाही त्यामुळे अनेक तरुणांचा कळ हा आजही मुंबईकडेच आहे. या मतदारसंघातील खारेपाटण विभाग या विभागात पाण्याचा गंभीर प्रश्न,प्रदूषणाचा विळखा, रासायनिक कारखान्यांमुळे वाया गेलेली शेती. ठप्प पडलेला मत्स्य व्यवसाय असे अनेक प्रश्न या दोघांनाही सोडवण्यात अपयश आलं. त्यामुळे रवींद्र पाटील यांना येथील जनता कंटाळली असल्याच पहायला मिळतंय.त्यामुळे भाजपमधून अपक्ष उमेदवारी लढवणारे प्रसाद भोईर यांना ऐन वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट देण्यात आले आणि या मतदारसंघातून प्रसाद भोईर यांना मतदारांचा वाढता पाठिंबा पहायला मिळतय प्रसाद भोईर हे देखील उच्चशिक्षित आणि येथील समस्यांचा प्रश्न समोर ठेऊन रणांगणात उतरले आहेत.तर दुसरीकडे लंडनहून डिग्री घेऊन आलेले आर्किटेक्ट डिझायनर शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांना देखील तितकाच वाढता पाठिंबा पहायला मिळतो आहे. त्यामुळे या दोन नवख्या तरुणांना (उमेदवारांना)या मतदारसंघातून वाढता पाठिंबा लक्षात घेत नक्की या दोघांमध्ये कोणाच पारडं जड होणार हे येत्या 23 तारखेलाच उघड होईल.