कर्नाटकात त्रिशंकू अवस्था झाली तर? 25-30 आमदारांच्या जीवावर कुमारस्वामी पुन्हा मुख्यमंत्री होणार की भाजप फोडाफोडीचं राजकारण करणार? या आहेत 'तीन' शक्यता
Karnataka Exit Poll: 2018 साली भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेपासून दूर राहिला होता. त्यावेळचा काँग्रेसने टाकलेला डाव आता भाजप टाकण्याच्या तयारीत असेल.
Karnataka Exit Poll: कर्नाटक विधानसभेसाठी मतदान पार पडलं आणि आता उमेदवार आपल्याला किती मतं मिळाली असतील याचा अंदाज लावत बसल्याचं दिसून येतंय. बहुतांश एक्झिट पोल समोर आले असून त्यामध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचं समोर येत आहे. कर्नाटकात त्रिशंकू अवस्था राहण्याची जास्त शक्यता असून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल असं एक्झिट पोलचे अंदाज सांगतात. 2018 प्रमाणे यंदाही दोन काँग्रेस असो वा भाजप, दोघांनाही कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षाला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्या वेळी 37 आमदार असलेले कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यंदाही 25 ते 30 आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री होणार का की भाजप फोडाफोडीचं राजकारण करुन पुन्हा सत्तेत येणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
Karnataka Exit Poll: एक्झिट पोल काय सांगतोय?
एबीपी न्यूज सी व्होटरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 83 ते 95 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाला 21 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकमध्ये कुणाला किती जागा?
एकूण जागा - 224
बहुमत - 113
काँग्रेस - 100 ते 112
भाजप - 83 ते 95
जेडीएस - 21 ते 29
इतर - 2 ते 6
Karnataka Result 2018 : गेल्या वेळी 37 आमदारांच्या जीवावर कुमारस्वामी मुख्यमंत्री
गेल्या वेळच्या म्हणजे 2018 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजे 104 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर जनता दलला 37 जागा मिळाल्या होत्या. भाजपला बहुमतासाठी आठ जागांची गरज होती. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या मदतीने भाजप सहज सत्तेत येईल अशी आशा व्यक्त केली जात होती.
पण सत्तेतून बाहेर गेलेल्या काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला सत्तेपासून रोखयचं होतं. त्यामुळे त्यांनी जनता दलच्या कुमारस्वामी यांच्याशी संधान बांधलं. काँग्रेस असो वा भाजप, कुमारस्वामी यांना घेतल्याशिवाय कुणालाही सत्तेत येणं शक्य नव्हतं. त्यामुळे कुमारस्वामींनी आपले फासे टाकायला सुरुवात केली.
H. D. Kumaraswamy: कुमारस्वामी थेट मुख्यमंत्रीपदी
2018 सालच्या निवडणुकीत राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाचा फायदा कुमारस्वामींनी उठवला. भाजपसोबत गेलं तर त्यांना मागेल ती मंत्रीपदं देण्याची ऑफर होती. तीच ऑफर काँग्रेसचीही होती. पण काँग्रेसच्या जागा कमी असल्याने त्यांच्याशी बार्गेनिंग करण्याचा पर्याय कुमारस्वामींनी निवडला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर जनता दलला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे अशी अटच त्यांनी टाकली.
कुमारस्वामी यांनी टाकलेल्या राजकीय डावामुळे काँग्रेसची मोठी पंचायत झाली. आधीच त्या पक्षातले दोन-तीन बडे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून मुख्यमंत्रीपदासाठी सज्ज झाले होते. त्यात आता कसं करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. कुमारस्वामी यांच्यासोबत जाऊन मंत्रीपदं मिळवायची की भाजपकडे चेंडू ढकलायचा या पेचात काँग्रेस अडकली.
पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर कुमारस्वामींची अट मान्य करण्यात काय गैर नाही असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आला आणि अवघ्या 37 आमदारांच्या जीवावर कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. सर्वात जास्त जागा मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागलं होतं.
भाजपने काँग्रेसचे 18 आमदार फोडले
हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास दूर गेल्याचं शल्य भाजपला होतं. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने यामध्ये लक्ष घातलं आणि दोनच वर्षात म्हणजे 2019 साली काँग्रेसचे 18 आमदार फोडले. त्या सर्वांना पुन्हा निवडून आणलं आणि त्यांना मंत्रिपदंही दिली. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचं, प्रत्येक आमदाराला 100 कोटी रुपये आणि मंत्रिपद दिल्याचा आरोप काँग्रेसने केला. पण साम-दाम-दंड- भेद या नीतीचा वापर करुन भाजप सत्तेत आलं.
आताही कुमारस्वामी यांना संधी
गेल्या वेळी 37 आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालेले कुमारस्वामी यांना आताही संधी असेल अशी स्थिती आहे. यावेळी त्यांच्या पक्षाला 21 ते 29 जागा मिळतील अशी शक्यता आहे. तसेच काँग्रेस किंवा भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. तसेच अपक्षांची संख्याही 2 ते 6 इतकीच असेल. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या दाराशी गेल्याशिवाय कर्नाटकात सत्ता स्थापन होणार नाही अशी शक्यता दिसतेय.
गेल्यावेळचा काँग्रेसचा डाव यंदा भाजप टाकणार, दोन शक्यता
1. जर काँग्रेसला 100 ते 105 या दरम्यान जागा मिळाल्या तर त्यांना सरकार स्थापन करणं अवघड आहे. कारण त्यांना कुमारस्वामी यांना सोबत घ्यावं लागेल किंवा भाजपकडे चेंडू ढकलावा लागेल. 88 ते 95 जागा जिंकण्याची शक्यता असणाऱ्या भाजपने जर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचं ठरवलं तर ते कुमारस्वामी यांच्यासोबत सत्ता स्थापन करु शकतील.
2. भाजपला मुख्यमंत्रीपद द्यायला कुमारस्वामी यांचा विरोध असेल किंवा मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवायची त्यांचा हट्ट असेल तर तोही भाजप स्वीकारण्याची शक्यता आहे. कारण 2024 सालच्या लोकसभेसाठी राज्यातून जास्त खासदार निवडून द्यायचे असतील तर राज्यातील सत्ता महत्त्वाची असणार आहे याची कल्पना भाजपला असणार आहे.
3. काँग्रेसला कुमारस्वामी यांच्यासोबत युतीची चर्चा करावी लागेल. मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कसं राहिल हे काँग्रेसला पाहावं लागेल. तसं जर झालं नाहीच तर शेवटचा पर्याय म्हणून कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देऊन महत्त्वाची मंत्रीपदं आपल्या पदरात पाडून घ्यावी लागतील.
वरच्या शक्यता पाहता कर्नाटकात जर त्रिशंकू अवस्था निर्माण झालीच तर त्याचा सर्वात जास्त फायदा हा कुमारस्वामी यांच्या पक्षाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजपला स्पष्ट बहुमत मिळू नये आणि अपक्षांची संख्या ही 2-4 पेक्षा जास्त असू नये अशीच इच्छा कुमारस्वामी यांची असेल, त्यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवले असतील.
ही बातमी वाचा :