WB Election 2021 Phase 5 Voting : पश्चिम बंगालमधील पाचव्या टप्प्यातील 45 विधानसभा जागांवर आज मतदान, आतापर्यंत 69.40 टक्के मतदान
West Bengal Assembly Election 2021 Phase 5 Polling Live Updates: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील पाचव्या टप्प्यातील 45 विधानसभा जागांवर आज मतदान सुरू आहे. या टप्प्यात 1 कोटी 13 लाख 73 हजार 307 मतदार 342 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
WB Election 2021 Phase 5 Voting : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज 45 जागांवर मतदान सुरू आहे. या टप्प्यात एकूण 1.3 कोटी मतदारांना सिलिगुडीचे महापौर अशोक भट्टाचार्य, राज्यमंत्री ब्रत्य बुस आणि भाजपचे सामिक भट्टाचार्य यांच्यासह 319 उमेदवारांचे राजकीय भाग्य ठरवावे लागेल. उत्तर 24 परगणाचे 16 मतदारसंघ, पूर्व वर्धमान आणि नादियामधील 8-8, जलपाईगुडीतील सात, दार्जिलिंगमधील पाच आणि कालीमपोंग जिल्ह्यातील एक मतदारसंघातील मतदान केंद्रांवर आज सायंकाळी 6.30 पर्यंत मतदान होईल. दरम्यान, आतापर्यंत 69.40 टक्के मतदान झालं आहे.
कूचबिहारमध्ये सीआयएसएफच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू आणि अज्ञात व्यक्तींच्या हल्ल्यात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर निवडणूक आयोगाने स्वतंत्र व निष्पक्ष मतदानासाठी किमान 853 सुरक्षा दलाची नेमणूक केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या प्रदेशातील अधिक जागांवर तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजप पुढे होता. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस 32, डाव्या आघाडी-काँग्रेस दहा तर भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. राज्यात 294 सदस्यांच्या विधानसभा सदस्यासाठी आठ टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिला टप्पा 27 मार्चला होता आणि शेवटचा टप्पा 29 एप्रिलला आहे.
लोकसभेच्या 2 आणि 13 विधानसभा जागांवर आज पोटनिवडणूक
11 राज्यांमधील दोन लोकसभा जागा आणि 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीअंतर्गत आज मतदान सुरू आहे. लोकसभेच्या जागांमध्ये कर्नाटकातील बेळगाव आणि आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथे मतदान होणार आहे. तर ज्या विधानसभेच्या जागांवर आज मतदान होणार आहे, त्यात मध्य प्रदेशातील दमोह, सहारा, सुजानगड आणि राजस्थानमधील राजसमंद, गुजरातमधील मोरवा हदाफ, महाराष्ट्रातील पंढरपूर, उत्तराखंडचा स्लट, झारखंडमधील मधुपुर, कर्नाटकातील बसवकल्याण आणि मस्क, मिझोरममधील सेरछिप, नागालँड नोकसेन तर तेलंगणाचे नागार्जुन सागर येथे पोटनिवडणूक होत आहे.