एक्स्प्लोर
विधानपरिषद पोटनिवडणूक : सांगलीचे भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता
विधानसभेत भाजप-शिवसेनेचे जास्त सदस्य असल्याने काँग्रेस ही निवडणूक लढण्याची शक्यता कमी असल्याचं दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं होतं
![विधानपरिषद पोटनिवडणूक : सांगलीचे भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता Vidhan Parishad By poll for seat vacant after Congress MLC Shivajirao Deshmukhs demise, BJP candidate Prithviraj Deshmukh may selected unopposed विधानपरिषद पोटनिवडणूक : सांगलीचे भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/27103346/Prithviraj-Deshmukh-BJP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या आमदारपदाच्या पोटनिवडणूक प्रकियेला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी सांगली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख भाजपकडून अर्ज भरणार आहेत. पृथ्वीराज देशमुख यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या आमदारकीची माळ बिनविरोध पडण्याची शक्यता आहे.
विधानसभेत भाजप-शिवसेनेचे जास्त सदस्य असल्याने काँगेस ही निवडणूक लढण्याची शक्यता कमी असल्याचं दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी 'एबीपी माझा'ला सांगितलं होतं. येत्या सात जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपचे 122, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. काँग्रेसचे 42, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सात अपक्ष, तर छोट्या पक्षांचे 13 आमदार आहेत.
पृथ्वीराज देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सांगली जिल्हात जिल्हाध्यक्षाच्या नात्याने भाजपचा विस्तार करण्यामध्ये देशमुखांचा मोलाचा वाटा राहिला आहे. तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्यांमध्ये एकसंधपणा ठेवत देशमुख यांनी संजयकाका पाटील यांना विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून देशमुख यांचं नाव पुढे आलं.
काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर कडेगाव पलुस तालुक्यात लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या आदेशानुसार उतरण्याचा पृथ्वीराज देशमुख यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता. यासाठी पृथ्वीराज देशमुख याचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पूर्ण ताकदीनिशी अर्जही भरला होता. मात्र नंतर मुख्यमंत्र्यांनी या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मान्य करत देशमुख कुटुंबाने पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
त्याच वेळी देशमुख कुटुंबाला विधानपरिषदेवर संधी देण्याचं आश्वासन भाजपने दिले होते. यानुसार विधानपरिषदेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने आता भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आणि पक्षाचा आदेश मानणाऱ्या पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
आमदार शिवाजीराव देशमुख यांचं 14 जानेवारी 2019 रोजी वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं होतं. संबंधित जागेवरील सदस्याचा कार्यकाळ 24 एप्रिल 2020 रोजी संपणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला केवळ 11 महिनेच कामकाजाची संधी मिळेल.
![विधानपरिषद पोटनिवडणूक : सांगलीचे भाजप नेते पृथ्वीराज देशमुख यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/21085538/Shivajirao-Deshmukh.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)