UP Election 2022 : बसपा अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
UP Assembly Election 2022 : बसपा अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस सतीश चंद्रा मिश्रा यांनी दिली आहे.
UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशसह इतर पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेपूर्वीपासूनच उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. अशातच उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक चर्चांनी जोर धरला होता. यातील महत्त्वाची चर्चा म्हणजे, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा यांच्या उमेदवारीबाबत. आता यासंदर्भात माहिती समोर आली आहे. बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्रा मिश्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या (BSP) अध्यक्षा मायावती (Mayawati) विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच, ते स्वतःही (सतीश चंद्रा मिश्रा) विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
"माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. समाजवादी पक्षाकडे 400 उमेदवार नसतील तर ते 400 जागा कशा जिंकणार? समाजवादी पार्टी किंवा भाजपा सत्तेवर येणार नाही, बसपा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार आहे.", असं बसपा खासदार सतीश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशची मुख्य लढत भाजप वि. सप
देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. यामध्ये सर्वाचं लक्ष लागलं आहे ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे. एबीपी न्यूजने केलेल्या सी व्होटर सर्व्हेमध्ये भाजप या राज्यात आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला 100 जागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर सपला 100 जागांचा फायदा होणार असून काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये केवळ 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता असून सपाला 145 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल. सध्यातरी उत्तर प्रदेशची निवडणूक ही भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशीच दिसत आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं
उत्तर प्रदेशमधील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उत्तरप्रदेशात 403 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. उत्तरप्रदेशात पहिला टप्पा 10 फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अनुक्रमे 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवार, 3 मार्च आणि 7 मार्चला पार पडणार आहे. निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार आहे.
निवडणुका जाहीर केल्यानंतर उत्तरप्रेदशात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकांदरम्यान कोरोनासंबंधित नियमांचे देखील पालन करयाचे आहे. यामध्ये सर्व पदयात्रा, सभांवर बंदी घालण्यात आलेली आहे. निवडणुक काळात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- UP Elections : युपी भाजपकडून निवडणूक पोस्टर जारी; योगीसंह मोदींच्याही चेहऱ्याचा वापर
- Uttar Pradesh Election 2022 Date: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, सात टप्प्यात होणार मतदान
- Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
- Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकीचा महासंग्राम; आधीचं बलाबल काय? यावेळी हे मुद्दे गाजणार
- ABP News C Voter Survey : कोरोना, मोदींचा चेहरा की योगींचं काम....निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार प्रभावी, पाहा काय म्हणतेय जनता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह