गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा सी-60 कमांडो पथकावर हल्ला, तीन कमांडो जखमी; कालपासूनचा तिसरा हल्ला
आईडीचा स्फोट करुन नक्षलवाद्यांनी कमांडो पथकावर गोळीबार केला. जखमी कमांडोंना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे.
गडचिरोली : गडचिरोलीत मतदान संपल्यानंतर नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो पथकावर हल्ला केला आहे. एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदी परिसरात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात सी- 60 कमांडो पथकातील तीन जवान जखमी झाले आहेत. कालपासून गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याची ही तिसरी घटना आहे, तर दिवसभरातील दुसरी घटना आहे.
मतदान प्रक्रियेनंतर बेस कॅम्पवर परतणाऱ्या सी-60 कंमाडो पथकाला नक्षलवाद्यांनी टार्गेट केलं. आईडीचा स्फोट करुन नक्षलवाद्यांनी कमांडो पथकावर गोळीबार केला. यामध्ये तीन कमांडो जखमी झाले आहेत. जखमी कमांडोंना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलं आहे.
वायुसेनेच्या हेलिकॉप्टरवही गोळीबार
याशिवाय याच भागात पोलिंग पार्टीला आणण्यासाठी गेलेल्या वायुसेनेच्या MI-70 हेलिकॉप्टरवही नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवांना या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही.
कालपासूनचा तिसरा हल्ला
आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी अतिदुर्गम वाघेझरी येथे अगदी मतदान केंद्राजवळ भुसुरुंग स्फोट घडवून आणला होता. सुदैवाने या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर काल गडचिरोलीच्या एट्टापल्ली तालुक्यातील जांभीया गट्टाजवळ नक्षलवाद्यांनी आयडीचा स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता.
निवडणुकीदरम्यान दहशत परसवण्यासाठी दहशतवाद्यांनी हे हल्ले घडवून आणले. मात्र या हल्ल्यांना न जुमानता गडचिरोतील नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावला.