Kishori Pednekar On Raj Thackeray: तुमच्याकडे पैसे असतील तर हिशोब द्या, बिनशर्ट किंवा इनशर्ट...; किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंना सुनावलं!
Kishori Pednekar On Raj Thackeray: राज ठाकरेंनी बिनशर्ट किंवा इनशर्ट पाठिंबा द्यावा...आम्हाला काही नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
Kishori Pednekar On Raj Thackeray: लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वणी येथेही असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडीओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. यावर ज्याच्या हातातून कधीच पैसे निघाले नाही. त्यांच्या बॅगेमध्ये काय मिळणार...फारफार तर रुमाल आणि कोमट पाणी असेल, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. राज ठाकरेंच्या या टीकेला आता ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंनी किती पायघड्या घातल्या आहेत. राज ठाकरेंनी पुन्हा भूमिका बदलली. राज ठाकरेंनी बिनशर्ट किंवा इनशर्ट पाठिंबा द्यावा...आम्हाला काही नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला. तसेच पैसा सुटत नाही म्हणतात, म्हणजे यांना अनुभव आलेला दिसतोय. आमच्याकडे पैसा नाही. तुमच्याकडे असेल तर हिशोब द्या, असं आव्हान किशोरी पेडणेकरांनी दिलं. स्वबळावर लढणार असे म्हटले होते. पण आता स्व ही राहिले नाही आणि बळ ही नाही राहिले. त्यांना वाटले होते की, मुख्यमंत्री निवडून आणतील. पण शेवटी राजकारण ते राजकारण, अशी बोचरी टीकाही किशोरी पेडणेकरांनी केली. दरम्यान उद्धव ठाकरेंची वारंवार बॅग तपासणी सुरु आहे. सगळ्यांना समान कायदा असायला हवा. उद्धव ठाकरेंचा अपमान करण्यासाठी बॅग तपासणी सुरु आहे. मागच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या एवढ्या बॅग कोणत्या होत्या, याची अद्याप माहिती मिळाली नाही. उद्धव ठाकरेंनी सवाल उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची बॅग तपासली.
संजय राऊत काय म्हणाले?
राज ठाकरेंच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला पैसे दिले आहे. सुपाऱ्या घेतात त्यांच्याकडे पैसे असतात. आमच्याकडे कुठे पैसा असणार...कोमट पाणी चांगलं असतं. आमच्या विमानात कोमट पाणी आहे ते पाणी पिऊन आम्ही दौरे करत आहोत, असं संजय राऊतांनी सांगितलं.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंची आज निवडणूक आयोगाच्या लोकांनी बॅग तपासली. परवा पण असंच झालं होतं. निवडणूक कर्मचाऱ्यांना कळत नाही त्यात काय भेटणार. ज्यांच्या हातातून कधी पैसे निघाले नाहीत त्यांच्या हातातून आणखीन काय निघणार. फारफार तर रुमाल आणि कोमट पाणी...असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली करताय, अरे आमच्यापण बॅग तपासल्या आहेत. अरे येवढा काय तमाशा करताय, अशी टीका राज ठाकरेंनी केली.