(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur News: सहकार शिरोमणी कारखान्याच्या मतमोजणीपूर्वीच मतपत्रिकेची क्लिप व्हायरल, सोलापुरात खळबळ
Solapur Sugar Factory Election: अभिजित पाटील पॅनेलचे चिन्ह असणाऱ्या घड्याळावर शिक्के मारलेली एक मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सोलापूर: पंढरपुरातील सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या मतमोजणीपूर्वीच मतपत्रिकेची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी या कारखान्यासाठी मतदान झालं होतं, रविवारी त्याची मतमोजणी आहे. पण त्यापूर्वीच मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कुणीतरी मतदारानेच मतदान करताना ही क्लिप केल्याचा आणि नंतर व्हायरल केल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला आहे.
सोलापूरातील दोन लोकसभा आणि चार विधानसभेचे कार्यक्षेत्र असणाऱ्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची (Sahakar Shiromani vasantrao kale Sakhar Karkhana Election) रविवारी मतमोजणी होणार आहे. पण त्याआधीच अभिजित पाटील पॅनेलचे चिन्ह असणाऱ्या घड्याळावर शिक्के मारलेली एक मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही मतपत्रिका एखाद्या मतदाराने खोडसाळपणे मतदान केंद्रात शूट करून व्हायरल केल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी केला आहे.
दरम्यान, या क्लिपमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मतमोजणी बूथ पद्धतीने करावी की मतपत्रिका एकत्र करून घ्यावी यावर दोन्ही पॅनेलने विरुद्ध भूमिका घेतल्याने प्रशासनाने दुपारी मतपत्रिका एकत्रित करून मतमोजणी करायचा निर्णय घेतला होता. मात्र याला विद्यमान अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या पॅनेलने आक्षेप घेतल्याने आता मतमोजणी बूथ पद्धतीने करण्याचा निर्णय अंतिम झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन गट आमनेसामने होते. मात्र विठ्ठलाच्या विजयानंतर अभिजित पाटील यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादीत घेतल्याने मूळ राष्ट्रवादीचे नेते नाराज होते. यातच अभिजित पाटील यांनी सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत पॅनल उतरवल्याने राष्ट्रवादीत उभी फूट पडली. यापूर्वीच भगिरथ भालके यांनी बीआरएसच्या प्रवेशाच्या हालचाली सुरु केल्या असताना दुसरे नाराज मोठे नेते कल्याणराव काळे यांना भाजपने गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे उद्याच्या मतमोजणीकडे राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांचेही लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणीत कोणतीही गडबडीत नसल्याचा खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
दोन लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघात कारखान्याचे कार्यक्षेत्र
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे दोन लोकसभा आणि चार विधानसभा मतदारसंघातील 105 गावात कार्यक्षेत्र आहे. यासाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासह पंढरपूर मंगळवेढा , सांगोला , मोहोळ आणि माढा या विधानसभा मतदारसंघात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. विद्यमान चेअरमन आणि राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे अभिजित पाटील, डॉ. बी. पी. रोंगे अॅड. दीपक पवार यांनी एकत्रित येत पॅनेल उभे केले आहे. या दोन्ही नेत्यांनी अतिशय टोकाच्या भाषेत टीका केल्यामुळं ही निवडणूक चांगलीच गाजली आहे.