मुख्यमंत्रीपद आमची प्रथम मागणी, उपमुख्यमंत्रीपद नंतरचा विषय : शिवसेना
मातोश्रीवरची शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक पार पडली. शिवसेना-भाजपला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे. तसेच भाजपकडून लेखी प्रस्ताव घ्यावा अशी मागणीही शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.
मुंबई : राज्याच्या सत्तेत समसमान वाटा मिळावा अशी मागणी शिवसेना आमदारांची केली आहे. मातोश्रीवर आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. तसेच सत्ता स्थापनेबाबत युतीत जो निर्णय होईल, तो भाजपकडून लिहून घ्यावा अशी मागणीही शिवसेना आमदारांनी केली आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना-भाजपचा 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. याशिवाय अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं, असंही ठरलं होतं, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी आमदारांना बैठकीत दिली. त्यामुळे आता भाजपकडून लेखी प्रस्ताव येणं अपेक्षित आहे. त्यामुळे लेखी निर्णय येत नाही, तोपर्यंत उद्धव ठाकरे कुठलाही निर्णय घेणार नाहीत. तसेच उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्व आमदारांना मान्य असेल, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
सर्वप्रथम आमची मागणी मुखमंत्रीपदाची आहे. उपमुख्यमंत्रीपद आमच्यासाठी नंतरचा विषय आहे. मुख्यमंत्री पदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला भाजपने लोकसभा निवडणुकीआधी मान्य केला होता. 144-144 जागांचा फॉर्म्युलाही मान्य केला होता. मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला काही गोष्टींमुळे मान्य होऊ शकला नाही. मात्र आता सत्तास्थापनेसाठी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला कायम ठेवावा, अशी मागणी आमदारांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेनं उत्तम राजकीय टायमिंग साधत 'हीच ती वेळ' हे दाखवून दिलं आहे.
अमित शाह-उद्धव ठाकरे एकत्र निर्णय घेतली- रावसाहेब दानवे
कुठल्याही प्रकरची अडचण न येता दोन्ही पक्षाचे नेते बसून हा फॉर्म्युला ठरवतील. मात्र अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत नेमंक काय झालं याची माहिती कुणालाही नाही. मात्र दिवाळीनंतर सगळे प्रश्न सुटतील, असं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
दिवाळीनंतर राज्यात शिवसेना-भाजप सत्तास्थापन करेल. मात्र मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं, भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी यांनी सरोज पांडे यांनी म्हटलं. मात्र शिवसेनेच्या भूमिकेनंतर भाजपला सहजासहजी मुख्यमंत्री मिळेल, अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना-भाजपमध्ये किती ओढाताण होते हे पाहावं लागेल.