Shivdi Vidhan Sabha: मोठी बातमी: शिवडी विधानसभेतून भाजपचा ठाकरे गटाविरोधातील उमेदवार ठरला? निष्ठावंताच्या मुलाला उमेदवारी
Maharashtra Election 2024: भाजप शिवडी मतदारसंघात उमेदवार देणार, ठाकरे गटाचा तिढा अद्याप कायम
मुंबई: विधानसभा निवडणुकीत मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असलेल्या शिवडी मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी ठाकरे गटातील (Thackeray Camp) नेत्यांमध्ये सध्या चुरस आहे. त्यामुळे येथून ठाकरेंचा उमेदवार कोण असणार, याचा फैसला अद्याप झालेला नाही. तर दुसरीकडे भाजपने शिवडी मतदारसंघातील (Shivdi Vidhan Sabha) आपला उमेदवार निश्चित केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे शिवडीत कुठलाही बडा चेहरा नसल्याने भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे.
भाजपकडून शिवडीतून गोपाळ दळवी यांना उमेदवारी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. गोपाळ दळवी हे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. गोपाळ दळवी हे माजी आमदार शिवराम दळवी यांचे पुत्र आहेत. नवरात्र, दहीहंडीच्या काळात गोपाळ दळवी यांनी 'शिवडीच्या विकासासाठी बदल' या टॅगलाईनखाली बॅनर्स लावून जोरदार जाहिरातबाजी केली होती. तेव्हाच गोपाळ दळवी यांनी शिवडीतून लढण्यासाठी इच्छूक असल्याचे संकेत दिले होते. मराठी दांडिया आणि दहीहंडी उत्सवातही शिवडीत सेलिब्रिटींची रीघ लावत गोपाळ दळवी यांनी मराठी मतदारांच्या मनात घर करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्यामुळे आता भाजप गोपाळ दळवी यांना संधी देणार किंवा सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार ही जागा शिंदे गटालाच मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे अजय चौधरी शिवडी मतदारसंघातून विजयी झाले होते. शिवसेनेतील बंडानंतर अजय चौधरी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी इमान कायम राखले होते. मात्र, यंदा त्यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. कारण, या मतदारसंघातून लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हेदेखील इच्छूक आहेत. या दोन्ही नेत्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. मात्र, या दोघांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायला नकार दिल्याने शिवडीचा तिढा अजूनही कायम आहे.
शाखाप्रमुख ते पदाधिकाऱ्यांचा सुधीर साळवींना पाठिंबा
विधानसभेच्या उमेदवारीसाठी शिवडी विधानसभेतील पाचपैकी पाच शाखाप्रमुखांनी सुधीर साळवी यांना पाठिंबा दिला आहे. युवासेना आणि महिला पदाधिकाऱ्यांनी देखील सुधीर साळवींच्या बाजुने कौल दिला आहे. मात्र, अजय चौधरी हे ज्येष्ठ नेते असल्याने मातोश्रीवरुन त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आणखी वाचा
'अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलगा...'; राऊतांच्या विधानाने भुवया उंचावल्या, माहीममध्ये काय होणार?